केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीसंतवरील तीन वर्षांची बंदी उठवली
तिरुवनंतपुरम, 01 जुलै (हिं.स.) केरळ क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत याच्यावर घातलेली तीन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. दृश्य आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या काही विधानांमुळे असोसिएशनची बदनामी झाली, असे कार
एस. श्रीसंत


तिरुवनंतपुरम, 01 जुलै (हिं.स.) केरळ क्रिकेट असोसिएशनने भारताचा माजी क्रिकेटपटू एस. श्रीसंत याच्यावर घातलेली तीन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. दृश्य आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या काही विधानांमुळे असोसिएशनची बदनामी झाली, असे कारण देत श्रीसंतला यापूर्वी तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्याने या शिस्तभंगाच्या कारवाईला तिरुवनंतपुरम मुन्सफ न्यायालयात आव्हान दिले होते, पण ती याचिका फेटाळण्यात आली होती, असे केसीएने सांगितले. त्यानंतर, श्रीसंतने केरळ क्रिकेट असोसिएशनविरुद्ध केलेल्या विधानांबद्दल खेद व्यक्त करत अधिकृत आणि बिनशर्त माफीनामा सादर केला. १ जुलै २०२६ रोजी झालेल्या केसीएच्या विशेष सर्वसाधारण सभेत त्याच्या माफीनाम्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याने बिनशर्त खेद व्यक्त केल्याचे लक्षात घेऊन, सभेने एकमताने त्याच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला.

केरळ असोसिएशनने श्रीसंतला इशारा दिला की, भविष्यात अशाच प्रकारचे वर्तन केल्यास कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. बंदी उठवल्यामुळे, श्रीसंत आता केरळ क्रिकेट लीगच्या तिसऱ्या हंगामात 'एरीज कोल्लम सेलर्स' या फ्रँचायझीचा सह-मालक म्हणून काम पाहू शकणार आहे. केसीएनेने मागील केसीएल हंगामापूर्वी ही बंदी घातली होती.

भारताचा माजी वेगवान गोलंदाज श्रीसंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. आणि त्याने २७ कसोटी, ५३ एकदिवसीय आणि १० टी-२० सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३७.५९ च्या सरासरीने ८७ बळी घेतले; यात एका डावात ५/४० आणि एका सामन्यात ८/९९ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती, तसेच त्याने चार वेळा एका डावात चार बळी आणि तीन वेळा पाच बळी घेण्याचा पराक्रम केला होता.

एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ३३.४४ च्या सरासरीने ७५ बळी घेतले (सर्वोत्तम कामगिरी ६/५५), तर टी-२० सामन्यांमध्ये १० सामन्यांत सात बळी घेतले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये श्रीसंतने ७४ प्रथम श्रेणी सामने खेळून २१३ बळी (सर्वोत्तम कामगिरी ५/४०) घेतले आहेत. याव्यतिरिक्त ९२ 'लिस्ट ए' सामन्यांत १२४ बळी आणि ६५ टी-२० सामन्यांत ५४ बळी घेत त्याने विविध प्रकारांमधील आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande