आयसीसी टी-20 क्रमवारी : भारताचा इशान किशन पहिल्यांदाच अव्वल स्थानी विराजमान
दुबई, 01 जुलै (हिं.स.)भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आता टी-२० क्रिकेटमधील जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले असून, गेल्या वर्षभरापासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्
इशान किशन


दुबई, 01 जुलै (हिं.स.)भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशन आता टी-२० क्रिकेटमधील जगातील नंबर-१ फलंदाज बनला आहे. ताज्या क्रमवारीनुसार, त्याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले असून, गेल्या वर्षभरापासून अव्वल स्थानी असलेल्या अभिषेक शर्माचे वर्चस्व संपुष्टात आणले आहे. टी-२० फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा इशान हा चौथा भारतीय क्रिकेटपटू आहे. बेलफास्ट येथे आयर्लंडविरुद्ध भारताची नुकतीच झालेली दोन सामन्यांची टी-२० मालिका संपल्यानंतर इशानने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च क्रमवारी गाठली.

आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत इशान किशनची कामगिरी निराशाजनक होती, त्याने पहिल्या सामन्यात १ धाव आणि दुसऱ्या सामन्यात केवळ १२ धावा केल्या होत्या. मात्र, पुरुष टी-२० विश्वचषकापासून हा फलंदाज चांगल्या लयीत आहे. या डावखुऱ्या फलंदाजाने विश्वचषकात २०० हून अधिक स्ट्राइक रेटने ३१७ धावा केल्या होत्या.

अभिषेकने जवळपास १२ महिने अव्वल स्थान कायम राखले होते. विराट कोहली, सूर्यकुमार यादव आणि अभिषेक यांच्यानंतर इशान किशन आता टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचणारा चौथा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. भारत आता इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार असून, या मालिकेत अभिषेक आणि ईशान यांच्यात अव्वल स्थानासाठीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्यात केवळ सात रेटिंग गुणांचा फरक आहे. इशान किशनचे ८७६ गुण आहेत, तर अभिषेकचे ८६९ गुण आहेत.

आयर्लंडचे क्रिकेटपटू लॉर्कन टकर (चार स्थानांनी वर चढून ७७ व्या स्थानावर) आणि रॉस अडायर (सहा स्थानांनी वर चढून ८४ व्या स्थानावर) यांनी बेलफास्टमध्ये भारताविरुद्धच्या प्रभावी कामगिरीनंतर क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव हे देखील आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल १० मध्ये आहेत. तिलकचे स्थान कायम आहे, तर सूर्याची क्रमवारीत एका स्थानाने खाली घसरण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande