विम्बल्डन 2026 : सेरेना विल्यम्सला पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का
लंडन, १ जुलै (हिं,स.) अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सचे जवळपास चार वर्षांनंतर एकेरीतील बहुप्रतिक्षित पुनरागमन अयशस्वी ठरले. सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन राहिलेल्या सेरेनाला पहिल्याच फेरीत ऑस्ट्रेलियाच्या २० वर्षीय माया जॉइंटने ६-३, ६-७ (६), ६-३ ने
सेरेना विल्यम्स


लंडन, १ जुलै (हिं,स.) अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्सचे जवळपास चार वर्षांनंतर एकेरीतील बहुप्रतिक्षित पुनरागमन अयशस्वी ठरले. सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन राहिलेल्या सेरेनाला पहिल्याच फेरीत ऑस्ट्रेलियाच्या २० वर्षीय माया जॉइंटने ६-३, ६-७ (६), ६-३ ने पराभव स्वीकारावा लागला. सेरेना २०२२ च्या यूएस ओपननंतर प्रथमच एकेरीचा सामना खेळली. दीर्घकाळच्या अनुपस्थितीमुळे, तिचे कोणतेही एकेरी रँकिंग नव्हते आणि तिला वाइल्ड कार्डद्वारे विम्बल्डनमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

सेरेनाने नेहमीप्रमाणे वेगवान सर्व्हिस आणि शक्तिशाली ग्राउंडस्ट्रोकचे प्रदर्शन केले असले तरी, जागतिक क्रमवारीत ८७ व्या क्रमांकावर असलेल्या माया जॉइंटने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावत सामना जिंकला.

सामन्यानंतर सेरेना म्हणाली, विम्बल्डनमध्ये परतणे माझ्यासाठी खूप खास होते. मी इथे पुन्हा खेळेन अशी कल्पनाही केली नव्हती. सेंटर कोर्टवर पाऊल ठेवणे आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मिळवणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.

विजयानंतर माया जॉइंट म्हणाली की, तिला सामन्याच्या आदल्या रात्री झोप लागली नाही. ती पुढे म्हणाली की, जे घडले त्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. सेरेना एक महान खेळाडू आहे. लहानपणापासून या कोर्टवर खेळण्याचे माझे स्वप्न होते आणि तिच्याविरुद्ध जिंकणे अविश्वसनीय आहे.

सामन्यात दोन्ही टेनिसपटूंनी प्रत्येकी ३७ अनफोर्स्ड एरर्स (विनाकारण चुका) केल्या, परंतु जॉइंटने ४० विनर्स मारले, तर सेरेनाला केवळ २६ विनर्स मारता आले. ऑल इंग्लंड क्लबमधील माया जॉइंटची ही दुसरी उपस्थिती होती आणि विम्बल्डनमधील तिच्या कारकिर्दीतील हा पहिला विजय होता. दुसरीकडे, सेरेनाच्या नावावर विम्बल्डनमध्ये ९८ एकेरी सामने जिंकण्याचा विक्रम आहे. सेरेना आता या आठवड्याच्या उत्तरार्धात खेळल्या जाणाऱ्या महिला दुहेरीच्या स्पर्धेत तिची मोठी बहीण व्हीनस विल्यम्ससोबत खेळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande