चीनमधील बूट कारखान्यात भीषण आग; २८ जणांचा मृत्यू
बीजिंग , 10 जुलै (हिं.स.)।चीनमधील एका बूट उत्पादन कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत २८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या जिनजियांग शहरातील एका बूट कारखान्यात गुरुवारी आग लागली. या दुर्घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या २८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांना
चीनमधील बूट कारखान्यात भीषण आग; २८ जणांचा मृत्यू


बीजिंग , 10 जुलै (हिं.स.)।चीनमधील एका बूट उत्पादन कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत २८ कामगारांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या जिनजियांग शहरातील एका बूट कारखान्यात गुरुवारी आग लागली. या दुर्घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या २८ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, आग कारखान्याच्या पहिल्या मजल्यावर लागली आणि काही वेळातच तिने पाच मजली इमारतीला वेढले. याच इमारतीत कंपनीचे गोदाम आणि वेअरहाऊसही होते. कारखान्यात बूट निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वलनशील साहित्याचा मोठा साठा असल्याने आग झपाट्याने पसरली. अग्निशमन दलाने सुमारे चार तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत २८ जणांचा मृत्यू झाला होता.

आग लागली तेव्हा कारखान्यात सुमारे २३७ कर्मचारी काम करत होते. याशिवाय दोन अभ्यागतही (व्हिजिटर्स) उपस्थित होते. अग्निशमन आणि बचाव पथकांनी २१३ जणांना सुरक्षित बाहेर काढले, मात्र २८ जणांना वाचवता आले नाही.या घटनेनंतर पोलिसांनी कारखान्याच्या मालकाला अटक केली असून कंपनीची बँक खाती गोठविण्यात (फ्रीज) आली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

चीनच्या आपत्कालीन व्यवस्थापन मंत्रालयाने सांगितले की, आग लागल्यानंतर बचाव आणि मदतकार्यांवर देखरेख ठेवण्यासाठी संयुक्त पथक जिनजियांग शहरात पाठविण्यात आले आहे. हे शहर पूर्व चीनमधील फुजियान प्रांतातील क्वानझोउ परिसरात स्थित आहे. मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही आग दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात लागली होती.

या दुर्घटनेबाबत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. तसेच कार्यस्थळांवर वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटनांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. शी जिनपिंग म्हणाले की, यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासून देशात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमधून धडा घेत सर्व राज्ये आणि संबंधित विभागांनी कार्यस्थळांवरील सुरक्षाविषयक त्रुटी दूर करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande