
- कुटुंबियांसह सात जणांवर गुन्हा दाखल
- आरोप खोटे असल्याची विनायक राऊतांची प्रतिक्रिया
ठाणे, 12 जुलै (हिं.स.)। ठाकरे सेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार विनायक राऊत, त्यांचा मुलगा तसेच मुंबई महापालिकेतील नगरसेवक गितेश राऊत आणि कुटुंबातील इतर सदस्य, अशा एकूण सात जणांविरोधात ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी दिलेल्या तक्रारीवरून कौटुंबिक छळासह जादूटोणा विरोधी कायद्यान्वयेही गुन्हा नोंदवण्यात आला असून, या प्रकरणात एका भोंदूबाबालाही पोलिसांनी अटक केली आहे. गिरीजा राऊत यांनी आपल्या तक्रारीत वैवाहिक आयुष्य, मानसिक छळ आणि कुटुंबीयांच्या वागणुकीबाबत अनेक गंभीर आरोप केले आहेत.
गिरीजा राऊत यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सासू शामल राऊत या पती समोर नसताना वेगवेगळ्या प्रकारे वागत असत. सतत टोमणे मारणे, माहेरच्या लोकांचा अपमान करणे आणि पती-पत्नीमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच पती गितेश राऊत माझ्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद मोबाईलमध्ये ठेवत होता. विनायक राऊत यांच्या राजकीय कार्यक्रमांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून मासिक पाळी पुढे ढकलण्यासाठी गोळ्या घेण्यास माझ्यावर दबाव टाकला जात होता, असा आरोपही त्यांनी केला आहे.
लग्नानंतर उटी येथे सहलीला गेल्यानंतर सहा दिवस पतीने कोणतेही शारीरिक संबंध ठेवले नाहीत. याबाबत विचारणा केल्यावर मानसिक जुळवून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगत विषय टाळला. पुढे मंदिरात दर्शनासाठी गेले असताना लोकांसमोर अपमानास्पद भाषा वापरून माझा अवमान करण्यात आला. पती सार्वजनिक ठिकाणीही वेळ, परिस्थिती किंवा माझ्या भावनांचा विचार न करता वारंवार वाद घालत असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
गिरीजा राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, पतीचे मत असे होते की, शारीरिक संबंध फक्त परदेशातील ठिकाणीच ठेवता येतात, भारतात त्याला ते सोयीचे वाटत नव्हते. घरी जवळीक साधण्याचाही तो विविध कारणे देत टाळत असे. या सततच्या वागणुकीमुळे मानसिक त्रास वाढला आणि दोघांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारही घेतले. मात्र पती कोणत्याही उपचारांना सहकार्य करत नव्हता. त्यानंतर लैंगिक आरोग्य तज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञांचाही सल्ला घेण्यात आला. नैसर्गिक गर्भधारणेसह विविध पर्याय डॉक्टरांनी सांगूनही पतीने फक्त आयव्हीएफ प्रक्रियेवर आग्रह धरत घरच्या घरी संबंधित प्रक्रिया करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला, विरोध केल्यास शिवीगाळ आणि दमदाटी केली, असा आरोप त्यांनी केला आहे.
तक्रारीनुसार, या सर्व घडामोडींची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली होती. मात्र परिस्थिती सुधारण्याऐवजी वैद्यकीय सल्ल्यावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोपही गिरीजा राऊत यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोप हे तक्रारदाराने केलेले असून त्यांची सत्यता न्यायालयीन आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे - विनायक राऊत
मी आणि माझ्या कुटुंबीयांवर लावलेले आरोप खोटे आहेत. गेल्या तीन वर्षांपासून गितेश आणि गिरीजा एकत्र राहत नाहीत. 2018 मध्ये घटना घडली असे सांगते आणि 2026 मध्ये त्याची तक्रार करत आहेत. यातंच काही काळं आहे. प्रत्येक वेळी तिचे आई-वडील तिच्यासोबत होते. सध्या त्यांची घटस्फोट केस सुरू आहे, अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली. या नोटिसमध्ये दर महिन्याला खर्चासाठी 5 लाख द्यावे. याशिवाय 10 कोटींची अधिक रक्कम द्यावी. मानसिक नुकसान भरपाई 2 कोटी द्यावी, अशी मागणी गिरीजा राऊत यांनी केली आहे. 5 रूमचं घर आणि ऑटोमॅटीक गाडी मागितली आहे. या मागण्या पूर्ण होत नाहीत, म्हटल्यावर तिने तक्रार केली, असा दावा विनायक राऊतांनी केला. आम्ही अघोरी उपचारांच्या आरोपांचे पूर्ण खंडन करतो. आम्ही त्या पंथातले नाही. आई-वडील समोर असताना तेव्हा तक्रार केली नाही. या संदर्भात आम्ही न्यायालयात गेलो आहोत, असं विनायक राऊत म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule