पावसाची दांडी, निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका; राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात
मुंबई, 12 जुलै (हिं.स.)। राज्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसमोर अस्मानी आणि सुलतानी अशी दुहेरी संकटे उभी ठाकली आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्
Farmers in the state face a double whammy a dry spell and the impact of substandard soybean seeds


मुंबई, 12 जुलै (हिं.स.)। राज्यात यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांसमोर अस्मानी आणि सुलतानी अशी दुहेरी संकटे उभी ठाकली आहेत. जून महिन्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात काही भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतल्याने अनेक भागांतील पिके धोक्यात आली आहेत. त्यातच निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून राज्यातील विविध जिल्ह्यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील राजुरा येथे निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महालोक, बूस्टरच्या ‘हुतुतु’, महादेव इन्वेजसह विविध कंपन्यांच्या बियाण्यांची पेरणी करून दहा ते अकरा दिवस उलटल्यानंतरही उगवण न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. तक्रारीनंतर संबंधित कंपनीचे अधिकारी शेताची पाहणी करण्यासाठी आले असता संतप्त शेतकऱ्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. ग्रामपंचायत सदस्य भूषण काळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने बोलावण्याची मागणी करत तीव्र संताप व्यक्त केला.

अकोला जिल्ह्यातही सोयाबीन बियाण्यांच्या उगवणीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. प्राथमिक प्रयोगशाळा अहवालात काही बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आल्यानंतर बूस्टर आणि रवी सीड्स या कंपन्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोल्यासह धाराशिव, लातूर, जालना, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांतही सोयाबीन न उगवल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

दरम्यान, अकोला जिल्ह्यातील तेल्हारा आणि अकोट तालुक्यांमध्ये रोहीं अर्थात नीलगायींच्या कळपांनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. उगवलेली पिके नीलगायींकडून फस्त केली जात असल्याने शेतकऱ्यांना रात्रंदिवस शेतात पहारा द्यावा लागत आहे. वनविभागाकडे तक्रारी करण्यात आल्या असून नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे.

मराठवाड्यातही पावसाअभावी परिस्थिती चिंताजनक बनली आहे. हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून सरासरीच्या तुलनेत सुमारे ५६ टक्के तूट आहे. त्यामुळे नद्या-नाले कोरडे पडले आहेत, धरणांमध्ये अपेक्षित पाणीसाठा झालेला नाही आणि पावसाच्या भरोशावर पेरणी केलेली पिके करपू लागली आहेत. जुलैचा दुसरा आठवडा संपत असतानाही कयाधू नदी कोरडी असल्याचे चित्र आहे. एकीकडे अनियमित पाऊस, तर दुसरीकडे निकृष्ट बियाणे आणि वन्य प्राण्यांचा वाढता उपद्रव यामुळे राज्यातील शेतकरी अभूतपूर्व संकटाचा सामना करत असून शासनाने तातडीने नुकसानभरपाई, दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई आणि प्रभावी दिलासा उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande