ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताकडून निषेध
नवी दिल्ली , 12 जुलै (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीत जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर इराणने हल्ला केला. या जहाजावर ११ भारतीय नागरिक होते. हल्ल्यानंतर १० जणांची सुटका करण्यात आली असली, तरी एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, भारताच्या पर
ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारताकडून निषेध


नवी दिल्ली , 12 जुलै (हिं.स.)।होर्मुझ सामुद्रधुनीत जीएफएस गॅलेक्सी या व्यापारी जहाजावर इराणने हल्ला केला. या जहाजावर ११ भारतीय नागरिक होते. हल्ल्यानंतर १० जणांची सुटका करण्यात आली असली, तरी एक भारतीय नागरिक अद्याप बेपत्ता आहे. दरम्यान, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या या हल्ल्याचा निषेध केला आहे.

ओमानच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, होर्मुझ सामुद्रधुनीजवळील ईशान्य ओमानमधील काही भागांवर ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले. यापूर्वी इराणने ओमानवरील हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा केला होता, मात्र ओमानच्या सल्तनतीने तो दावा मान्य केलेला नाही.

परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “आज ओमानच्या किनाऱ्याजवळ व्यापारी जहाज जीएफएस गॅलेक्सीवर झालेल्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. जहाजावरील ११ भारतीयांपैकी १० जणांची आतापर्यंत सुटका करण्यात आली असून, एका भारतीय नागरिकाचा अद्याप शोध लागलेला नाही.”

निवेदनात पुढे म्हटले आहे की, “शोध व बचाव मोहिमेसाठी मंत्रालय ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत आहे. ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, शोध व बचाव कार्यासाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी सक्रियपणे संपर्कात आहे. सहकार्याबद्दल आम्ही ओमानच्या अधिकाऱ्यांचे आभार मानतो.”

परराष्ट्र मंत्रालयाने पुढे म्हटले, “या प्रदेशातील व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेले हल्ले अत्यंत चिंताजनक आहेत. तणाव तातडीने कमी करण्यासाठी आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेला यश मिळावे, अशी आमची भूमिका आहे, जेणेकरून या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य पुन्हा प्रस्थापित होईल. व्यापारी जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे तात्काळ थांबवले पाहिजे. तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय जलमार्गांवरील जहाजांची वाहतूक आणि व्यापार कोणत्याही अडथळ्याशिवाय शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यात यावा.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande