गायिका जॅस्मिन सँडलसच्या आयुष्यात नवी सुरुवात; कॉन्सर्टमध्येच केली साखरपुड्याची घोषणा
गुरुग्राम, १२ जुलै (हिं.स.) : भारतीय-अमेरिकन पंजाबी गायिका जॅस्मिन सँडलस हिने तिच्या ''द ड्रीम गर्ल इंडिया टूर'' दरम्यान लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना मोठा धक्का देत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. तिने स्टेजवर आपल्या होणारे पती शेखर चौधरी यांन
जॅस्मिन सँडलसच्या आयुष्यात नवी सुरुवात; कॉन्सर्टमध्येच साखरपुड्याची घोषणा


गुरुग्राम, १२ जुलै (हिं.स.) : भारतीय-अमेरिकन पंजाबी गायिका जॅस्मिन सँडलस हिने तिच्या 'द ड्रीम गर्ल इंडिया टूर' दरम्यान लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहत्यांना मोठा धक्का देत आपल्या साखरपुड्याची घोषणा केली. तिने स्टेजवर आपल्या होणारे पती शेखर चौधरी यांना बोलावून साखरपुड्याची अंगठी दाखवत त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केली.

कॉन्सर्टदरम्यान जॅस्मिन म्हणाली, हे आहेत माझे चौधरी साहेब. यांनीच माझ्या या बोटात ही अंगठी घातली आहे. त्यानंतर शेखर चौधरी स्टेजवर आले. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात दोघांचे जोरदार स्वागत केले. जॅस्मिनने तिची एंगेजमेंट रिंग सर्वांना दाखवली आणि शेखरला मिठी मारत आनंद व्यक्त केला.

यानंतर या दोघांनी जॅस्मिनच्या लोकप्रिय 'लावां' या गाण्यावर रोमँटिक सादरीकरण करत चाहत्यांची मने जिंकली. या खास प्रसंगी जॅस्मिनने सोनेरी रंगाचा भरजरी लेहेंगा आणि पारंपरिक दागिने परिधान केले होते.

या कॉन्सर्टमध्ये तिने 'पंजेबा', 'सिप सिप', 'शरारत', 'धुरंधर', 'इल्लीगल वेपन' आणि 'यार ना मिले' यांसारखी लोकप्रिय गाणी सादर केली. 'द ड्रीम गर्ल इंडिया टूर' अंतर्गत तिचे पुढील कार्यक्रम मुंबई, बेंगळुरू आणि चंदीगड येथे होणार आहेत.

साखरपुड्याच्या घोषणेनंतर शेखर चौधरी यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या व्यवसाय किंवा वैयक्तिक पार्श्वभूमीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उल्लेखनीय म्हणजे, जॅस्मिन सँडलस हिचे नाव यापूर्वी पंजाबी गायक गॅरी संधू यांच्यासोबत जोडले गेले होते. जालंधर येथे जन्मलेल्या आणि अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये वाढलेल्या जॅस्मिनने 'मुस्कान' या गाण्याद्वारे संगीत क्षेत्रात पदार्पण केले. तर 'किक' चित्रपटातील 'यार ना मिले' या सुपरहिट गाण्यामुळे तिला बॉलिवूडमध्ये मोठी ओळख मिळाली. या गाण्यासाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिकेचा पुरस्कारही मिळाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande