महाराष्ट्रासह भारताच्या ७० टक्के भागातून ढग नाहीसे; पुढील काही दिवस पावसाची शक्यता कमी
नवी दिल्ली, 12 जुलै (हिं.स.)। देशातील सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग दूर झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील पाच दिवस राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता कमी राहण्याच
Monsoon Clouds Vanish From 70% India


नवी दिल्ली, 12 जुलै (हिं.स.)। देशातील सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग दूर झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पुढील पाच दिवस राजस्थान, दिल्ली-एनसीआर, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यामुळे मध्य प्रदेश, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशासह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामान तज्ज्ञांच्या मते, मान्सूनला सक्रिय ठेवणारी प्रमुख हवामान प्रणाली सध्या कमकुवत झाली आहे. 9 जुलैनंतर बंगालच्या उपसागरात कोणतीही नवीन मजबूत कमी दाबाची प्रणाली तयार झालेली नाही. त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांना आवश्यक आर्द्रता मिळू शकलेली नाही. तसेच मान्सूनचा पट्टा आपल्या नेहमीच्या स्थानापेक्षा उत्तरेकडे सरकला आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये ढगांची निर्मिती आणि पावसाचे प्रमाण कमी झाले आहे.

दरम्यान,जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे शनिवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे अचानक पूरस्थिती निर्माण झाली. या घटनेत अनेक शेतांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही रस्ते वाहून गेले आहेत. दुसरीकडे उत्तराखंडमधील विकासनगर येथे मुसळधार पावसामुळे लखवार जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन झाले. या दुर्घटनेत अनेक वाहने आणि यंत्रसामग्री मातीखाली गाडली गेली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, 12 जुलैनंतर काही दिवस देशातील मान्सून आणखी कमकुवत राहण्याची शक्यता आहे. सध्या तीन प्रमुख जागतिक हवामान प्रणाली मान्सूनच्या विरोधात काम करत आहेत. जुलैच्या पहिल्या दहा दिवसांत एल निनो आणि ला निनाशी संबंधित एनएसओ प्रणालीचा प्रभाव मान्सूनसाठी फारसा अनुकूल राहिला नाही. मात्र मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशन म्हणजे एमजेओ आणि काही छोट्या हवामान प्रणालींमुळे देशातील काही भागांमध्ये चांगला पाऊस झाला.

येत्या काळात प्रशांत महासागरात तयार होणाऱ्या तीन हवामान प्रणाली बंगालच्या उपसागरात पोहोचल्यास 18 ते 25 जुलैदरम्यान मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या एमजेओ कमकुवत टप्प्यात असून भारतासाठी अनुकूल स्थितीत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस देशातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande