
- अखिल भारतीय प्रांत प्रचारकांच्या बैठकीचा समारोप
बेळगाव, 12 जुलै (हिं.स.) : कर्नाटकच्या बेळगाव येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांच्या बैठकीचा आज, रविवारी समारोप झाला. शुक्रवारी 10 जुलै रोजी सुरू झालेल्या या बैठकीत संघांच्या शाखांचा विस्तार, शताब्दी वर्ष आणि जनगणनेच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह देशभरातील एकूण 226 कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत मार्च 2026 नंतर संघाच्या विविध स्तरांवर आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण वर्गांचा आढावा घेण्यात आला. यंदा देशभरात एकूण 83 संघ शिक्षण वर्ग आणि 12 कार्यकर्ता विकास वर्ग पार पडले असून, त्यामध्ये 18 हजार 842 स्वयंसेवकांनी प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणामध्ये शाखा संचालन, संघाची कार्यपद्धती, ग्रामविकास, कुटुंब प्रबोधन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संवर्धन आदी विषयांचा समावेश होता.शाखास्तरावरील कार्ययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच सप्टेंबर महिन्यात राबविण्यात येणाऱ्या व्यापक शाखा विस्तार योजनेचाही आढावा घेण्यात आला.
संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आतापर्यंत पार पडलेल्या कार्यक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले असून, उर्वरित कार्यक्रमांच्या नियोजनावरही विचारविनिमय झाला. शताब्दी वर्षातील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संपर्कात आलेल्या नागरिकांना सामाजिक कार्यात आणि ‘पंच परिवर्तन’ अभियानात सक्रिय करण्याच्या योजनांवरही चर्चा झाली. याशिवाय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या 2026-27 या वर्षातील प्रवास आराखड्यावरही विचार करण्यात आला.
बैठकीत सध्याच्या राष्ट्रीय घडामोडींशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. विशेषतः जनगणनेच्या पार्श्वभूमीवर आवश्यक माहिती, लोकसंख्येतील असमतोलामुळे निर्माण होणारी आव्हाने, अमली पदार्थांच्या वाढत्या दुष्परिणामांबाबत चिंता आणि व्यसनमुक्तीसाठी प्राधान्याने प्रयत्न करण्याची गरज यावर भर देण्यात आला. तसेच संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 650 व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या नियोजनावरही चर्चा झाली.
बैठकीत श्रीरामजन्मभूमी मंदिरातील दानपेटीतील देणग्यांच्या मोजणीदरम्यान झालेल्या कथित अनियमिततेच्या घटनेबाबत उपस्थितांनी दुःख व्यक्त केले. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या विनंतीनुसार सुरू असलेली विशेष तपास पथक (एसआयटी) आणि पोलिसांची कारवाई निर्णायक टप्प्यावर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि राम मंदिराबाबत देशभरातील रामभक्तांच्या श्रद्धेला कोणताही धक्का लागू नये, यासाठी तीर्थक्षेत्र न्यासाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी