
नवी दिल्ली, 12 जुलै (हिं.स.)। भारत आणि कॅनडा यांच्यात प्रस्तावित व्यापक आर्थिक भागीदारी करार (सीईपीए) संदर्भातील तिसऱ्या फेरीची चर्चा ओटावा येथे पूर्ण झाली आहे. दोन्ही देशांनी या करारावरील चर्चा 2026 पर्यंत पूर्ण करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आहे.
वाणिज्य विभागाने रविवारी ‘एक्स’ वर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘‘भारत आणि कॅनडाने 06 ते 10 जुलैदरम्यान ओटावा येथे भारत-कॅनडा सीईपीएसाठी चर्चेची तिसरी फेरी पूर्ण केली आहे. चर्चेदरम्यान अनेक स्तरांवर सकारात्मक प्रगती झाली असून, दोन्ही देशांच्या नेत्यांनी व्यक्त केलेल्या सामायिक दृष्टिकोनानुसार 2026 मध्ये चर्चा पूर्ण करण्याची आपली संयुक्त वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे.’’
विभागाने सांगितले की, दोन्ही देशांदरम्यान वस्तू आणि सेवांचा व्यापार, बौद्धिक संपदा, मूळ स्थानाचे नियम, स्वच्छता आणि वनस्पती स्वच्छता संबंधित उपाययोजना तसेच व्यापारातील तांत्रिक अडथळे यांसारख्या मुद्द्यांवर पाच दिवस चर्चा झाली. ही चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे, कारण भारत आणि कॅनडाने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 50 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
वाणिज्य विभागाच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार 8.22 टक्क्यांनी घटून 7.95 अब्ज अमेरिकी डॉलर राहिला, जो आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 8.66 अब्ज अमेरिकी डॉलर होता. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारताची कॅनडाला निर्यात 4.67 अब्ज डॉलर, तर आयात 3.28 अब्ज डॉलर इतकी होती.
उल्लेखनीय आहे की, भारताकडून कॅनडाला होणाऱ्या प्रमुख निर्यातीमध्ये औषधे, लोखंड आणि पोलाद, समुद्री उत्पादने, सूती वस्त्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि रसायने यांचा समावेश आहे. तर कॅनडाकडून भारतात प्रामुख्याने डाळी, मोती आणि अर्ध-मौल्यवान दगड, कोळसा, खते, कागद आणि कच्चे पेट्रोलियम यांची आयात केली जाते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule