
मुंबई, 12 जुलै (हिं.स.)।मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली आहे. रविवारी नवी मुंबई पोलिसांना आलेल्या एका अज्ञात फोन कॉलमध्ये ताज महाल पॅलेस हॉटेल उडवून देण्याची धमकी देण्यात आली.धमकीचा फोन मिळताच पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मुंबई पोलीस सध्या या कॉलचा स्रोत शोधत असून सर्व संभाव्य धागेदोरे तपासले जात आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, नवी मुंबई पोलिसांना रात्री सुमारे १२ वाजता एक फोन आला होता. या कॉलमध्ये आलिशान हॉटेल बॉम्बस्फोट करून उडवून देण्याचा दावा करण्यात आला. ही माहिती तत्काळ मुंबई पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी हॉटेल परिसराची सखोल तपासणी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून हॉटेलची कसून झडती घेण्यात आली. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी तपास सुरू आहे.
दरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्याला अशाच प्रकारची बनावट बॉम्बधमकी मिळाल्यानंतर अवघ्या एका दिवसात ही घटना घडली आहे. त्या धमकीमुळे काही काळासाठी उच्च सतर्कतेची स्थिती निर्माण झाली होती. मुंबई आणि दिल्ली पोलीस नियंत्रण कक्षांच्या समन्वयाने या दोन्ही धमक्यांच्या स्रोताचा सखोल तपास करत आहेत. संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य कारवाई करण्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode