अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोग; भावनिक पोस्टद्वारे दिली माहिती
मुंबई , 13 जुलै (हिं.स.)।हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची पत्नी तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मेधा यांनी सोशल मीडियावरील एका भावनि
अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कर्करोग; भावनिक पोस्टद्वारे दिली माहिती


मुंबई , 13 जुलै (हिं.स.)।हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची पत्नी तसेच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्याबाबत एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. मेधा यांनी सोशल मीडियावरील एका भावनिक पोस्टद्वारे आपण कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असल्याची माहिती दिली आहे.

मेधा यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत आपल्याला हाय-ग्रेड युरिनरी ब्लॅडर कॅन्सर झाल्याची माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी उपचारादरम्यानचा आपला प्रवास, संघर्ष आणि भावना व्यक्त केल्या आहेत.मेधा यांनी लिहिले आहे, “आयुष्यातील काही प्रवास असे असतात, जे तुम्हाला कायमचे बदलून टाकतात. हा त्यापैकीच एक प्रवास होता. माझ्या उपचारांचा एक टप्पा पूर्ण होत असताना आणि माझा वाढदिवस जवळ येत असताना, मी मागे वळून पाहते. दररोज मला उभारी देणाऱ्या त्या अदृश्य हातांची आठवण होते. अनेकजण मला विचारतात की, तुम्ही यावर कशी मात केली? त्याचे उत्तर अगदी सोपे आहे.” त्या पुढे म्हणतात, “मी हा प्रवास कधीच एकटीने केला नाही. जेव्हा जेव्हा मला वाटले की आता पुढे एक पाऊलही टाकता येणार नाही, तेव्हा कोणीतरी माझ्या सोबत चालताना दिसले. मागे वळून पाहताना मला जाणवते की ते केवळ योगायोग नव्हते. माझा हात धरून मला आधार देण्याची ती देवाचीच पद्धत होती.”

मेधा या महेश मांजरेकर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. 1995 मध्ये महेश मांजरेकर यांचा पहिल्या पत्नी दीपा मेहता यांच्याशी घटस्फोट झाल्यानंतर त्यांनी मेधा यांच्याशी विवाह केला. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. त्यापैकी सई मांजरेकर ही अभिनेत्री असून तिने सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

चित्रपटसृष्टीतील कलाकारांना कर्करोगाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी सोनाली बेंद्रे, महिमा चौधरी आणि संजय दत्त यांसारख्या अनेक कलाकारांनी या गंभीर आजारावर मात केली आहे. आता या यादीत मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. मेधा मांजरेकर यांच्या या खुलाशानंतर चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांना धैर्य, सकारात्मकता आणि लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande