
पाटणा, 13 जुलै (हिं.स.)।पाटणा येथील गाजलेल्या कोचिंग वाद प्रकरणात खान ग्लोबल स्टडीजचे संचालक फैजल खान यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणा सिव्हिल न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने फैजल खान यांच्यासह त्यांच्या संस्थेतील आणखी तीन कर्मचाऱ्यांनाही अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. तसेच, सध्या कारागृहात असलेल्या त्यांच्या दोन सुरक्षा रक्षकांनाही जामीन मिळाला आहे.
मुसल्लहपूर येथे 2 जूनच्या रात्री झालेल्या मारहाण आणि गोळीबार प्रकरणात अटकेची शक्यता लक्षात घेऊन आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय जाहीर केला. यापूर्वी सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
या प्रकरणात ज्ञान बिंदू संस्थेचे संचालक रौशन आनंद आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना यापूर्वी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले होते. नंतर त्यांना जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर फैजल खान यांचे दोन सुरक्षा रक्षक प्रदीप कुमार आणि तालेबर सिंह यांनाही अटक करण्यात आली होती. तेव्हापासून दोघेही बेऊर कारागृहात बंद होते.
दरम्यान, एक व्हिडीओ समोर आल्यानंतर फैजल खान यांचे नावही एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यांच्या सुरक्षा रक्षकांकडून गोळीबार घडवून आणल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. पोलिस तपासादरम्यान दोन्ही सुरक्षा रक्षकांकडे असलेल्या शस्त्रांच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode