
तेजस एमके 1-ए कार्यक्रमाला मिळणार गती
नवी दिल्ली, 13 जुलै (हिं.स.) : भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यात भर घालणाऱ्या एलसीए तेजस एमके1-ए कार्यक्रमाला दिलासा मिळाला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला (एचएएल) अमेरिकेच्या जीई एरोस्पेस कंपनीकडून सातवे एफ 404-आयएन-20 इंजिन प्राप्त झाले असून, सहाव्या इंजिनातील तांत्रिक बिघाडही दूर करण्यात आला आहे. त्यामुळे तेजस एमके1-ए विमानांच्या उत्पादनाला वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एफ404-आयएन 20 हे इंजिन तेजस लढाऊ विमानाचा सर्वात महत्त्वाचा घटक मानले जाते. हे आधुनिक, हलके आणि उच्च क्षमतेचे इंजिन असून, विमानाला आवश्यक वेग, शक्ती आणि चपळता प्रदान करते. जीई एरोस्पेसकडून एचएएलला या इंजिनांचा पुरवठा केला जात आहे.
यापूर्वी भारतात दाखल झालेल्या सहाव्या इंजिनात एचएएलच्या गुणवत्ता तपासणीदरम्यान तांत्रिक त्रुटी आढळून आली होती. त्यानंतर जीई एरोस्पेसने आवश्यक दुरुस्ती करून इंजिन पुन्हा कार्यक्षम केले. एचएएलने त्याची तपासणी पूर्ण केली असून, ते आता वापरासाठी सज्ज आहे.
तेजस एमके1-ए कार्यक्रमाला इंजिन पुरवठ्यातील विलंब आणि तांत्रिक एकत्रीकरणाच्या (इंटिग्रेशन) प्रक्रियेमुळे दोन वर्षांहून अधिक उशीर झाला आहे. संरक्षण मंत्रालय आणि भारतीय वायुसेना या प्रकल्पावर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. तसेच, वायुसेनेच्या आवश्यकतांनुसार एचएएलने अनेक तांत्रिक सुधारणा केल्यानेही प्रकल्पाला अतिरिक्त वेळ लागला.
मात्र, आता इंजिनांचा पुरवठा नियमित होत असल्याने उत्पादन प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. आवश्यक इंटिग्रेशन, प्रमाणन (सर्टिफिकेशन) आणि वायुसेनेची अंतिम मंजुरी वेळेत मिळाल्यास तेजस एमके1ए विमानांची पहिली तुकडी यंदाच्या अखेरीस सुपूर्द केली जाऊ शकते.
तेजस एमके1ए हे भारताचे स्वदेशी हलके लढाऊ विमान असून, त्यामध्ये अत्याधुनिक रडार, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली, अधिक प्रगत शस्त्रास्त्र क्षमता आणि सुधारित इंजिन कार्यक्षमता देण्यात आली आहे. भारतीय वायुसेनेने अशा 83 तेजस एमके1ए विमानांची ऑर्डर दिली असून, या विमानांमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर सातत्याने वाढविण्यात येत आहे.
सध्या इंजिनासाठी भारताला परदेशी कंपनीवर अवलंबून राहावे लागत असले, तरी भविष्यात 'कावेरी' किंवा इतर स्वदेशी इंजिन विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जीई एरोस्पेस आणि एचएएल यांच्यातील समन्वय सुधारल्याने भविष्यातील पुरवठा अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे.
संरक्षण तज्ज्ञांच्या मते, इंजिन पुरवठ्यातील सुधारणा हा तेजस एमके1ए कार्यक्रमासाठी सकारात्मक संकेत आहे. वेळेत चाचण्या आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यास भारतीय वायुसेनेला लवकरच आधुनिक तेजस एमके1ए लढाऊ विमाने मिळतील, ज्यामुळे देशाची हवाई संरक्षण क्षमता अधिक बळकट होईल.-------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी