
जयपूर, 13 जुलै (हिं.स.)। बाडमेर-जोधपूर राष्ट्रीय महामार्गावर पचपदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात पाच युवकांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. भरधाव वेगाने धावणारी स्कॉर्पिओ समोरून जात असलेल्या डंपरला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की स्कॉर्पिओचा अक्षरशः चुराडा झाला आणि त्यातील प्रवासी वाहनातच अडकून पडले. अपघातानंतर घटनास्थळी एकच आक्रोश उसळला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनातून बाहेर काढले आणि पोलिसांना माहिती दिली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात पचपदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाडिंयावास गावाजवळ झाला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून बालोतरा येथील शासकीय नाहटा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी रेवंताराम (२६), स्वरूपाराम (२७) आणि भरत (२५) यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी किशन, भावेश, बाबू, मुकेश आणि हेमाराम यांना प्राथमिक उपचारानंतर जोधपूरला रेफर करण्यात आले. जोधपूरमध्ये उपचारादरम्यान किशन (२७) आणि भावेश यांचाही मृत्यू झाला.
मृतांची ओळख बालोतरा जिल्ह्यातील कानोड गावातील रेवंताराम (वडील गेनाराम जाट), स्वरूपाराम (वडील मेहराराम जाट), भरत (वडील बन्नाराम जाट), किशन (वडील शेराराम जाट) आणि भावेश (वडील कलाराम जाट) अशी झाली आहे. हेड कॉन्स्टेबल डूंगाराम खोथ यांनी सांगितले की, सर्व युवक जोधपूर येथे भोमियाजींच्या दर्शनासाठी गेले होते आणि दर्शन करून गावाकडे परतत असताना हा अपघात झाला.
अपघाताची माहिती मिळताच बालोतरा येथील शासकीय नाहटा रुग्णालयात नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. सुरुवातीला तीन युवकांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता, तर पाच जण जखमी झाले होते. त्यांना जोधपूरला रेफर करण्यात आले. यापैकी किशन आणि भावेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या बाबू, मुकेश आणि हेमाराम यांच्यावर जोधपूरमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीसांनी मृतदेह शवागारात ठेवून पुढील कार्यवाही सुरू केली असून अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule