
- एसआयटीला मागितला स्टेटस रिपोर्ट
- सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
अयोध्या, 13 जुलै (हिं.स.) : अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी मिळालेल्या देणग्यांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या आरोपांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने संबंधित याचिकांवर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
सरन्यायमूर्ती सूर्यकांत तसेच न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) तपासाचा स्थिती अहवाल मागवला आहे. तसेच या प्रकरणाशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेशही दिले आहेत. देणगीच्या व्यवस्थापनात पारदर्शकता राखावी तसेच कथित आर्थिक गैरव्यवहारांची न्यायालयाच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी व्हावी, अशी मागणी विविध जनहित याचिकांद्वारे करण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या सोमवारी होणार असून, त्यावेळी एसआयटीच्या स्थापनेची माहिती आणि तपासाचा प्रगती अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात ऍड्. नरेंद्र कुमार गोस्वामी, अजय कुमार राय आणि इतर यांच्यासह राजदचे खासदार सुधाकर सिंह यांनी स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. याचिकांमध्ये मंदिरातील देणगीची नोंद, पुरावे जतन करणे आणि देणगी व्यवस्थापनात अधिक पारदर्शकता आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी