
चेन्नई, 13 जुलै (हिं.स.)। मदुरईजवळ सोमवारी पहाटे सरकारी बस आणि खासगी ओम्नी बस यांच्यात झालेल्या समोरासमोरच्या भीषण धडकेत एका महिलेसह पाच जणांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन्ही बसमधील ४१ प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी मेलूर सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना मदुरई येथील राजाजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात मदुरई जिल्ह्यातील कोट्टामपट्टीजवळील वंजीनगरम गावाजवळील चार पदरी राष्ट्रीय महामार्गावर झाला. दोन्ही बस भरधाव वेगाने येत असताना सोमवारी पहाटे हा अपघात घडला. चेन्नईहून मार्थांडमकडे जाणारी खासगी ओम्नी बस वंजीनगरम गावाजवळ पोहोचताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित बस प्रथम रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकावर जोरात आदळली. त्यानंतर बस विरुद्ध दिशेच्या मार्गिकेत गेली आणि मदुरईहून तिरुचिरापल्लीकडे जाणाऱ्या सरकारी बसला समोरासमोर धडकली.
सरकारी बसला धडकल्यानंतर खासगी ओम्नी बस डाव्या बाजूला वळली आणि वंजीनगरम गावातील नागरिकांच्या वापरासाठी उभारण्यात आलेल्या बस प्रवासी निवारा (बस शेल्टर)वर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की बस शेल्टर पूर्णपणे कोसळून त्याचे मोठे नुकसान झाले. दोन्ही बसमधील समोरासमोरच्या या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात बसमधून प्रवास करणाऱ्या एका महिलेसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही बसमधील ४१ प्रवासी गंभीर जखमी झाले. कोट्टामपट्टी पोलिस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमींना बाहेर काढून प्राथमिक उपचारासाठी मेलूर सरकारी रुग्णालयात पाठविले.
मेलूर सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी मदुरई येथील राजाजी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात पहाटेची वेळ असल्याने चालकाला झोप लागल्यामुळे हा अपघात झाला का, या शक्यतेचाही तपास केला जात आहे. या अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक अनेक तास विस्कळीत झाली.
नगर पोलिस उपमहानिरीक्षक (डीआयजी) अभिनव कुमार तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक देवनाथन यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. याशिवाय पोलिस मृतांची ओळख पटविणे आणि त्यांचा तपशील गोळा करण्याचे कामही करत आहेत. अपघाताची माहिती मिळताच मदुरईचे जिल्हाधिकारी निशांत कृष्णा यांनी मेलूर सरकारी रुग्णालयाला भेट देऊन उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यांनी जखमींना धीर दिला तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या उपचारांबाबत आणि प्रकृतीबाबत सविस्तर माहिती घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule