नीट पेपरफुटी : सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला उद्धव ठाकरेंचा पाठिंबा; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
मुंबई, 13 जुलै (हिं.स.)। नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाक
Uddhav Thackeray Backs Sonam Wangchuks Protest Slams Central Govt


मुंबई, 13 जुलै (हिं.स.)। नीट परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर सुरू असलेल्या सोनम वांगचूक यांच्या प्राणांतिक उपोषणाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला 16 दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी आपण सोनम वांगचूक यांच्याशी फोनवरून संवाद साधला होता. त्यावेळी त्यांना प्राणांतिक उपोषण करू नका, अशी विनंती केली होती. मात्र, सोनम वांगचूक यांनी देशाच्या हितासाठी आपले काहीही झाले तरी चालेल, अशी भूमिका घेतली. “मेरा कुछ भी होने दो, देश का भला होना चाहिए,” असे त्यांनी सांगितले. अशा विचारांच्या व्यक्तीसमोर आणखी काय बोलणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

केंद्र सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप केला. सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले जात असून त्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. येत्या 20 तारखेला दिल्लीतील जंतरमंतर येथे होणाऱ्या आंदोलनात देशातील सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. देशातील खासदारांनीही या आंदोलनात उपस्थित राहून तरुणांच्या भवितव्यासाठी आवाज उठवावा, असे ठाकरे म्हणाले.

नीट परीक्षेतील पेपरफुटीचा मुद्दा महिनाभरापासून चर्चेत असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. जंतरमंतर येथे अभिजीत दिपके यांनी हा विषय उपस्थित करून आंदोलन सुरू केले. हा केवळ राजकीय मुद्दा नसून देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांवर परिणाम झाला, काहींनी टोकाचे पाऊल उचलले, मात्र सरकारने त्याकडे पुरेसे लक्ष दिले नाही, असा आरोप त्यांनी केला.

सोनम वांगचूक यांच्या कार्याचा आणि बुद्धिमत्तेचा आदर केला पाहिजे, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, अशा व्यक्तींनाही देशद्रोही ठरवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यांचे उपोषण 16 दिवस सुरू असतानाही केंद्र सरकारकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याची टीका त्यांनी केली.

येत्या 20 तारखेच्या आंदोलनाआधी जंतरमंतरवर काही गुंड पाठवून हिंसाचार घडवून आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला. अभिजीत दिपके हे देशातील युवकांचा आवाज उठवत आहेत. युवक आणि पालकांनी आता जागे होण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा संदर्भ देताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, त्यावेळी सरकारने संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. एखाद्या व्यक्तीकडून जबाबदारी पार पाडली जात नसेल तर त्या व्यक्तीमध्ये बदल करण्यात काय गैर आहे, असा सवाल करत त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सक्षम व्यक्तीची नियुक्ती करण्याची मागणी केली. नीट परीक्षेतील गैरप्रकारांवर कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande