
* नंदकिशोर गोयंका होते संघाचे समर्पित स्वयंसेवक
* आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी घेतलेले वाहून
* बुधवारी 15 जुलैला हरियाणातील हिसार येथे अंत्यसंस्कार
मुंबई, १३ जुलै (हिं.स.) : भारतातील प्रसिद्ध मीडिया उद्योजक आणि झी समूहाचे (एस्सेल ग्रुप) अध्यक्ष डॉ. सुभाष चंद्रा यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. मुंबईत सोमवारी नंदकिशोर गोयंका यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 96 वर्षांचे होते. नंदकिशोर गोयंका यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या मरीन ड्राइव्ह येथील वसंत सागर, ए रोड या निवासस्थानी ठेवण्यात आले आहे.
नंदकिशोर गोयंका यांचा जन्म 28 सप्टेंबर 1930 रोजी झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्पित स्वयंसेवक होते. संघामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. व्यावसायिक क्षेत्रापासून दूर राहून त्यांनी आयुष्यभर समाजकार्य आणि गोसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलं होतं. वैश्य समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. तसंच महाराजा अग्रसेन यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अग्रोहाच्या विकासातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
नंदकिशोर गोयंका यांचे पार्थिव मंगळवार, 14 जुलै रोजी सकाळी 7 वाजता चार्टर्ड विमानाने हरियाणातील त्यांच्या मूळ गावी हिसार येथे नेण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव 166, गोयंका हाऊस, कृष्णा मंडी, हिसार येथे ठेवलं जाईल. त्यांच्यावर बुधवारी 15 जुलैला सकाळी 11 वाजता हरियाणातील हिसार येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अग्रोहा धाम येथील गोयंका उद्यानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यापूर्वी डॉ. सुभाष चंद्रा यांच्या आईचेही अंत्यसंस्कार याच उद्यानमध्ये करण्यात आलं होतं.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी