
परभणी, 14 जुलै, (हिं.स.)। जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे परभणी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस उपस्थित राहून परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत पायाभूत सुविधा, सिंचन, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्याच्या प्रगतीला अधिक गती देण्यासाठी आवश्यक सूचना व निर्णय घेण्यात आले.
यावेळी पाथरी मतदारसंघासह संपूर्ण परभणी जिल्ह्याशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न ठामपणे मांडले. सोनपेठ, पाथरी आणि मानवत येथे महावितरण विभागातील उपअभियंता पदे रिक्त असल्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या ठिकाणी तातडीने सक्षम व कार्यक्षम उपअभियंत्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली.
तसेच जून महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मानवत व परभणी तालुक्यात अनेक ठिकाणी पॉलिहाऊस आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत का, त्याची सद्यस्थिती काय आहे आणि त्यांना तातडीने आर्थिक मदत कशा पद्धतीने दिली जाणार याबाबत प्रशासनाकडून सविस्तर आढावा घेतला. तसेच पिक विमा २०२५ संदर्भातही महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. आयुक्त कार्यालयाकडे आवश्यक माहिती पूर्णपणे पाठविण्यात आली आहे का, विमा कंपनीकडे प्रकरणांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे का आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर विम्याचा लाभ मिळण्यासाठी कोणती कार्यवाही सुरू आहे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
माझा ठाम विश्वास आहे की विकास हा केवळ आश्वासनांचा विषय नसून प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संकल्प आहे. जनतेच्या विश्वासाच्या बळावर परभणी जिल्ह्याचा सर्वांगीण, संतुलित आणि शाश्वत विकास घडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत राहणार असून, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी नेहमीच आवाज बुलंद करत राहीन.
या बैठकीस पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे साहेब, आमदार सईद खान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी संजयसिंग चव्हाण, मनपा आयुक्त नितीनजी नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नितीशा माथूर, पोलीस अधीक्षक पंकज कुमावत तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis