नाशिक - केवळ 625 ग्रॅम वजनाच्या नवजात बाळावर शासनाच्या योजनेत यशस्वी उपचार
नामको हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी नाशिक, 14 जुलै, (हिं.स.) : नामको हॉस्पिटलच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने (NICU) अत्यंत आव्हानात्मक वैद्यकीय उपचार यशस्वीरीत्या पूर्ण करत केवळ 625 ग्रॅम वजनाच्या अतिजोखमीच्या नवजात बाळाला नवजीवन दिले आहे. विशेष
A newborn baby weighing


नामको हॉस्पिटलची उल्लेखनीय कामगिरी

नाशिक, 14 जुलै, (हिं.स.) : नामको हॉस्पिटलच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागाने (NICU) अत्यंत आव्हानात्मक वैद्यकीय उपचार यशस्वीरीत्या पूर्ण करत केवळ 625 ग्रॅम वजनाच्या अतिजोखमीच्या नवजात बाळाला नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे या बाळावरील संपूर्ण उपचार शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आले.

हे बाळ घरीच अकाली जन्मले होते. अत्यंत कमी वजन आणि गंभीर प्रकृतीमुळे अनेक नामांकित रुग्णालयांमध्ये उपचारास नकार मिळाल्यानंतर आदिवासी कुटुंबातील पालकांनी शेवटची आशा म्हणून नामको हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. येथे डॉ. निखिल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील अनुभवी वैद्यकीय टीमने बाळावर तत्काळ उपचार सुरू केले.

सुमारे दोन महिन्यांच्या सातत्यपूर्ण आणि अतिदक्ष उपचारांनंतर बाळाची प्रकृती लक्षणीयरीत्या सुधारली. उपचाराच्या सुरुवातीला 625 ग्रॅम असलेले बाळ डिस्चार्जच्या वेळी 1,310 ग्रॅम वजनापर्यंत पोहोचले. बाळाची प्रकृती स्थिर झाल्यानंतर 11 जुलै रोजी त्याला आनंदाने घरी सोडण्यात आले.

याविषयी माहिती देताना डॉ. निखिल कुलकर्णी म्हणाले, अतिशय कमी वजनाच्या नवजात बाळांवर उपचार करणे हे अत्यंत कौशल्यपूर्ण आणि जबाबदारीचे काम असते. अशा बाळांना संसर्गापासून सुरक्षित ठेवणे, योग्य तापमान व पोषण मिळेल असे वातावरण निर्माण करणे आणि 24 तास प्रशिक्षित डॉक्टर व नर्सिंग टीमकडून सातत्याने देखरेख करणे अत्यंत आवश्यक असते. नामको हॉस्पिटलमध्ये जागतिक दर्जाचे व्हेंटिलेटर्स, आधुनिक इन्क्युबेटर्स, फोटोथेरपी यंत्रणा आणि अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध असल्यामुळे अशा गुंतागुंतीच्या उपचारांमध्ये यश मिळू शकते. या बाळावर उपचार करताना बाळाला कृत्रिम दूध न देता, आईचे दूध दिले गेले, बाळाचे सर्व अवयव व्यवस्थित काम करत आहेत. व बाळाची वाढ आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार झालेली आहे.

या बाळावरील सर्व उपचार शासनाच्या आरोग्य योजनेअंतर्गत मोफत झाल्यामुळे पालकांनी नामको हॉस्पिटल, डॉक्टर आणि संपूर्ण वैद्यकीय टीमबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी नामको चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन श्री. सोहनलाल भंडारी आणि सचिव श्री. शशिकांत पारख यांनी डॉ. निखिल कुलकर्णी व संपूर्ण NICU टीमचे अभिनंदन करत त्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. तसेच बाळाच्या निरोगी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

नामको हॉस्पिटल अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांद्वारे सर्वसामान्यांना दर्जेदार व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande