‘संवाद वारी’ ठरतेय माहिती आणि जनजागृतीचे प्रभावी माध्यम
पुणे, 14 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणारा ‘संवाद वारी’ उपक्रम वारकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. माहितीपूर्ण प्रदर्शन, विकासकामांची माहिती देणारा
Nsks


पुणे, 14 जुलै (हिं.स.) : आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे राबविण्यात येणारा ‘संवाद वारी’ उपक्रम वारकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. माहितीपूर्ण प्रदर्शन, विकासकामांची माहिती देणारा चित्ररथ आणि लोककलेच्या माध्यमातून सादर होणाऱ्या कलापथकांच्या कार्यक्रमांद्वारे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, विकासकामे आणि जनहिताच्या उपक्रमांची माहिती लाखो वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या मार्गावर उभारण्यात आलेल्या ‘संवाद वारी’ उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भक्ती आणि विकास यांचा संगम साधत हा उपक्रम शासन व नागरिकांमधील संवाद अधिक प्रभावी करण्याचे काम करत आहे.

‘संवाद वारी’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या माहिती प्रदर्शनात राज्य शासनाच्या विविध विकासकामे आणि योजनांची माहिती आकर्षक छायाचित्रे, माहितीपूर्ण आलेख आणि सुबक मांडणीच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पायाभूत सुविधा, शेती, जलसंधारण, महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, पर्यावरण, पर्यटन, सामाजिक न्याय, आदिवासी विकास, डिजिटल सेवा तसेच विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती या प्रदर्शनातून उपलब्ध करून देण्यात येत आहे.

प्रदर्शन पाहण्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने गर्दी करत असून शासनाच्या योजनांविषयी अधिक माहिती जाणून घेत आहेत. या माध्यमातून नागरिकांमध्ये योजनांबाबत जागरूकता निर्माण होत आहे.

‘संवाद वारी’चा विशेष आकर्षण ठरलेला माहितीपर चित्ररथ वारी मार्गावर वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. आकर्षक दृश्यरचना, माहिती फलक, ध्वनिक्षेपकाद्वारे दिले जाणारे संदेश आणि विविध शासकीय योजनांची माहिती यामुळे हा चित्ररथ चालते-बोलते माहिती केंद्र बनला आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कलापथकांमार्फत भारूड, पोवाडे, शाहिरी, लोकगीते, नाटिका आणि गीतांच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती मनोरंजनासह प्रभावीपणे सादर केली जात आहे. लोककलेच्या माध्यमातून दिला जाणारा संदेश वारकऱ्यांपर्यंत सहज पोहोचत असून कार्यक्रमांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.

वारीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम म्हणून ‘संवाद वारी’ची ओळख निर्माण झाली आहे. शासनाच्या योजनांची अचूक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचल्याने विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळत आहे.

भक्ती, लोकसंस्कृती आणि विकास यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमातून शासनाच्या विकासाचा संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दि. 15 जुलै रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती येथे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद येथे मुक्कामी असणार आहे. या दोन्ही ठिकाणी ‘संवाद वारी’ अंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ आणि कलापथकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande