ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
परभणी, 14 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून 31 जुलैपर्य
ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजनेसाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन


परभणी, 14 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन योजना अंतर्गत सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी पात्र ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांकडून 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

या योजनेचा उद्देश राज्यातील ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना आर्थिक सहाय्य प्रदान करून त्यांच्या कला व साहित्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करणे हा आहे. साहित्य किंवा कला क्षेत्रात आयुष्य समर्पित केलेल्या आणि सध्या आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या पात्र साहित्यिक व कलाकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

योजनेअंतर्गत अर्जदाराचे वय 50 वर्षांपेक्षा अधिक असावे. दिव्यांग अर्जदारांसाठी वयोमर्यादेत 10 वर्षांची शिथिलता देण्यात आली असून, त्यांच्यासाठी किमान वय 40 वर्षे आहे. अर्जदाराने साहित्य किंवा कला क्षेत्रात किमान 15 वर्षांचे योगदान दिलेले असावे. साहित्य-कला क्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाचे कार्य करणारे, वयाने ज्येष्ठ, विधवा, परित्यक्ता व दिव्यांग कलाकारांना प्राधान्य दिले जाणार आहे. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न सर्व मार्गांनी मिळून 60 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. तसेच अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक असून, केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा.

इच्छुक व पात्र साहित्यिक व कलाकारांनी http:/aaplesarkar.mahaonline.gov.in/en या संकेत स्थळावर 31 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावा. ऑनलाइन अर्जाची प्रिंट व अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या सत्यप्रती संबंधित पंचायत समिती कार्यालयात जमा कराव्यात.

अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, लाभ न घेतल्याचे नोटरी सह प्रतिज्ञापत्र, बँक पासबुक, आवश्यक असल्यास अपंगत्वाचा दाखला, राज्य अथवा केंद्र शासनाचे प्रमाणपत्र, शिफारसपत्र तसेच कला किंवा साहित्य क्षेत्रातील योगदानाचे पुरावे स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे.

योजनेची सविस्तर माहिती, नियम व अटी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अपूर्ण, ऑफलाइन अथवा मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यापूर्वी अर्ज केलेल्या पात्र व इच्छुक साहित्यिक व कलाकारांनीही नव्याने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande