चिपळूण–पंढरपूर सायकल वारी चौथ्या वर्षीही उत्साहात
रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । विक्रांत आलेकर आणि प्रसाद आलेकर या बंधूंनी २०२२ मध्ये सुरू केलेल्या कोकणातील पहिल्या चिपळूण–पंढरपूर सायकल वारीने यंदा चार वर्षे पूर्ण केली. पहिल्या वर्षी अवघ्या १८ सायकलपटूंनी सुरू झालेल्या या उपक्रमात यंदा ३३ सायकलपटू
चिपळूण पंढरपूर सायकल वारी


रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । विक्रांत आलेकर आणि प्रसाद आलेकर या बंधूंनी २०२२ मध्ये सुरू केलेल्या कोकणातील पहिल्या चिपळूण–पंढरपूर सायकल वारीने यंदा चार वर्षे पूर्ण केली. पहिल्या वर्षी अवघ्या १८ सायकलपटूंनी सुरू झालेल्या या उपक्रमात यंदा ३३ सायकलपटूंनी सहभाग घेतला. यामध्ये चिपळूण सायकलिंग क्लबचे २८ तर दापोली सायकलिंग क्लबचे ५ सायकलपटू सहभागी झाले होते. विशेष म्हणजे यंदा ९ महिला सायकलपटू वारीत सहभागी झाल्या.

चिपळूण येथून भक्तिमय वातावरणात वारीला प्रारंभ झाला. अभंग, टाळ-मृदुंगाचा गजर, आरती आणि शिस्तबद्ध नियोजनाच्या साक्षीने निघालेली ही वारी दुसऱ्या दिवशी सायंकाळी पंढरपूर येथे पोहोचली. दोन दिवसांत सायकलपटूंनी सुमारे २५० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. पहिल्या दिवशी चिपळूण–कराड–विटा असा १४० किलोमीटरचा, तर दुसऱ्या दिवशी विटा–पंढरपूर असा ११० किलोमीटरचा टप्पा पार करण्यात आला.

वारीदरम्यान पंढपूर येथे अखिल भारतीय सायकल वारीतर्फे आयोजित ९० दिवसांच्या विशेष सायकलिंग चॅलेंजमध्ये चिपळूण सायकलिंग क्लबच्या ३५ हून अधिक सदस्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत क्लबचे अध्यक्ष प्रशांत दाभोळकर यांनी सातवा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांचा समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याबद्दल चिपळूण सायकलिंग क्लबचाही विशेष सन्मान करण्यात आला.

वारीच्या आयोजनासाठी सहभागींच्या मुक्कामाची, भोजनाची, सामान वाहतुकीसाठी ट्रकची तसेच आपत्कालीन मदतीसाठी चारचाकी वाहनाची व्यवस्था करण्यात आली होती. या नियोजनाबद्दल सहभागी सायकलपटूंनी आयोजकांचे कौतुक केले. आलेकर बंधूंनी २०२२ मध्ये सायकलद्वारे पंढरपूर वारी करण्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यानंतर या उपक्रमाला दरवर्षी वाढता प्रतिसाद मिळत असून, कोकणातील विविध भागांतील सायकलप्रेमी या वारीशी जोडले जात आहेत.

फिटनेस, पर्यावरण संवर्धन आणि विठ्ठलभक्तीचा सुंदर संगम घडविणाऱ्या या सायकल वारीमुळे सायकलिंगबाबत जनजागृती होत असून, अधिकाधिक नागरिक आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळत आहेत. पुढील वर्षी या वारीत आणखी मोठ्या संख्येने सायकलपटू सहभागी होतील, असा विश्वास आयोजक विक्रांत आलेकर आणि प्रसाद आलेकर यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande