
परभणी, 14 जुलै (हिं.स.) : गंगाखेड येथे सवंगडी कट्टा सामाजिक समूहाच्या वतीने पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या वारकरी माऊलींसाठी आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय मोफत आरोग्य सेवा शिबिराचा सांगता समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. वारकरी परंपरेप्रती आदरभाव आणि सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या सेवाभावी उपक्रमाला वारकरी तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गेल्या 7 जुलैपासून सुरू झालेल्या या आरोग्य सेवा उपक्रमात वारकरी माऊलींसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, प्रथमोपचार आणि विविध आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. संत जनाबाईंच्या जन्मभूमी असलेल्या गंगाखेड नगरीत वारकऱ्यांना प्रेम, आपुलकी आणि सेवाभावाचा अनुभव देण्याचा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आला.
यंदा या सेवायज्ञाचे सलग 11 वे वर्ष पूर्ण झाल्याने सांगता समारंभ विशेष उत्साहात पार पडला. यावेळी सेवाकार्यात योगदान देणारे डॉक्टर, स्वयंसेवक, देणगीदार, सेवाभावी नागरिक तसेच सवंगडी कट्टा सामाजिक समूहातील सदस्यांचा सत्कार करून गौरव करण्यात आला. उपस्थितांनी वारकरी परंपरेचे जतन, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव कायम ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वैद्यकीय चिकित्सक डॉ. शांतीलाल काबरा होते. प्रमुख पाहुणे म्हणून हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हेमंत मुंढे, संत जनाबाई संस्थानचे सचिव डॉ. दिनकर मुंढे, ज्येष्ठ वैद्यकीय चिकित्सक डॉ. संजय भरड, स्त्रीरोग तज्ज्ञ तथा जिल्हा परिषद सदस्या डॉ. शोभा कदम, सामाजिक कार्यकर्त्या मंजू दर्डा, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. अर्चना निरस, वैद्यकीय अधिकारी कैलास चांदकर तसेच समाजसेवक प्रभाकर आप्पा दावलबाजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी सवंगडी कट्टा सामाजिक समूहाच्या सातत्यपूर्ण समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले. समाजातील गरजू घटकांसाठी तसेच वारकरी बांधवांच्या सेवेसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सवंगडी कट्टा सामाजिक समूहातील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis