
मुंबई, 14 जुलै (हिं.स.)। भारताने कमी संसाधनांमध्ये अधिक दर्जेदार, परवडणारे आणि सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवणारे तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिल्यास डीप-टेक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सर्वसमावेशक नवोपक्रम हेच विकसित भारत २०४७चे प्रमुख आधारस्तंभ ठरतील, असे प्रतिपादन पद्मविभूषण डॉ. रघुनाथ अ. माशेलकर यांनी केले. फिक्की लिजेंड्स सिरीज अंतर्गत मुंबई येथे आयोजित ‘विनिंग थ्रू इनोव्हेशन : लेसन्स फॉर इंडस्ट्री अँड सोसायटी’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते.
रॉयल सोसायटीचे फेलो तसेच वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) चे माजी महासंचालक डॉ. माशेलकर यांनी उद्योग क्षेत्रातील नेते, उद्योजक, धोरणकर्ते, वैज्ञानिक आणि संशोधकांना संबोधित करताना सांगितले की, भारताने केवळ जगातील तंत्रज्ञानाचा वापर करणारा देश न राहता डीप सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सरकार-उद्योग सहकार्याच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे नवोपक्रम निर्माण करणारा देश बनले पाहिजे.
आपल्या ‘मोअर फ्रॉम लेस फॉर मोअर’ या तत्त्वज्ञानाची मांडणी करताना डॉ. माशेलकर म्हणाले की, कमी खर्चात अधिक प्रभावी, दर्जेदार आणि सर्वांसाठी उपलब्ध तंत्रज्ञान निर्माण करणे ही भारताची मोठी संधी आहे. नवोपक्रमाचे महत्त्व केवळ तांत्रिक गुंतागुंत किंवा महागड्या उत्पादनांवर अवलंबून नसून, समाजातील मोठ्या समस्या किती व्यापक पद्धतीने सोडवल्या जातात यावर ठरले पाहिजे. उत्कृष्टता, परवडणारी किंमत आणि सर्वसमावेशकता हे भारताच्या नवोपक्रम मॉडेलचे प्रमुख आधार असायला हवेत.
भारताने मर्यादित साधनसंपत्ती असूनही जागतिक दर्जाचे अनेक नवोपक्रम केले असल्याचे त्यांनी सांगितले. परवडणारी आरोग्यसेवा, डिजिटल सार्वजनिक सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित निदान प्रणाली आणि डीप-टेक स्टार्टअप्स ही त्याची उदाहरणे आहेत. स्मार्टफोनच्या माध्यमातून क्षयरोग निदान, थर्मल इमेजिंगद्वारे स्तनाच्या कर्करोगाची तपासणी आणि रक्त न काढता अॅनिमियाचे निदान करणाऱ्या तंत्रज्ञानाचा त्यांनी विशेष उल्लेख केला.
भारतीय उद्योगांनी आता केवळ जगातील सर्वोत्तम पद्धतींचे अनुकरण न करता जगासाठी नवीन कार्यपद्धती निर्माण करण्याची गरज असल्याचे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता ही ‘को-पायलट’ असावी, ‘ऑटोपायलट’ नव्हे, असे सांगत त्यांनी तंत्रज्ञानाच्या वापरात मानवी विवेक, नैतिकता आणि संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी फिक्कीचे माजी अध्यक्ष आर. व्ही. कनोरिया यांनी नवोपक्रम हे भारताच्या आर्थिक स्पर्धात्मकतेचे आणि तांत्रिक नेतृत्वाचे प्रमुख साधन असल्याचे सांगितले. फिक्की ड्रोन समितीचे सह-अध्यक्ष आणि आयडियाफोर्जचे सह-संस्थापक अंकित मेहता यांनी डॉ. माशेलकर यांच्या विचारांमधून तंत्रज्ञानाचा उद्देश कोट्यवधी लोकांचे जीवन बदलणारे उपाय निर्माण करणे हा असल्याचे नमूद केले.
फिक्की लिजेंड्स सिरीजमधील या विशेष सत्रात उद्योगपती, संशोधक, स्टार्टअप संस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. भारताला परवडणाऱ्या उत्कृष्टतेचा आणि डीप-टेक नवोपक्रमाचा जागतिक नेता बनविण्यासाठी आवश्यक उपायांवर यावेळी सखोल चर्चा करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule