भारत-मालदीव मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या संपन्न
भारत-मालदीव मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीत आठ तांत्रिक सत्रांमध्ये लक्षणीय प्रगती नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.)। द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारत-मालदीव मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) वाटाघा
India Maldives FTA talks conclude first round


भारत-मालदीव मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटीत आठ तांत्रिक सत्रांमध्ये लक्षणीय प्रगती

नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.)। द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीचा विस्तार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल म्हणून, भारत-मालदीव मुक्त व्यापार कराराच्या (एफटीए) वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या संपन्न झाली. 29 जून ते 7 जुलै 2026 या कालावधीत दूरदृश्य प्रणाली मार्फत या वाटाघाटी पार पडल्या. भारताच्या वाटाघाटी पथकाचे नेतृत्व वाणिज्य विभागाचे सहसचिव, मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी उज्ज्वल कुमार घोष यांनी केले, तर मालदीवच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्यांचे मुख्य वाटाघाटी प्रतिनिधी युसूफ रिझा यांनी केले.

पहिल्या फेरीत, दोन्ही बाजूंच्या वाटाघाटी पथकांनी आठ धोरणात्मक क्षेत्रांशी संबंधित असलेल्या आठ तांत्रिक सत्रांमध्ये कराराच्या मसुद्यावर चर्चा केली. दोन्ही देशांनी वाटाघाटींच्या विविध टप्प्यांवर भरीव प्रगती केली आणि अनेक मुद्द्यांवर व्यापक सहमती साधली. 8 जुलै 2026 रोजी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी मालदीवचे आर्थिक विकास, वाहतूक आणि व्यापार मंत्री मोहम्मद सईद यांची भेट घेतली. दोन्ही मंत्र्यांनी भारत-मालदीव मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींबरोबरच सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय आर्थिक उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला. भारत आणि मालदीव यांच्यातील राजनैतिक संबंधांची 60 वर्षे साजरी होत असताना, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय गुंतवणूक करार (बीआयटी) आणि मुक्त व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. तसेच पर्यटन, स्टार्टअप्स, डिजिटल पेमेंट्स, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग आणि व्यापार या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक दृढ करण्यास आणि सहकार्याच्या नव्या संधी शोधण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.

भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश आहे. 2025-26 या आर्थिक वर्षात भारत–मालदीव द्विपक्षीय व्यापार 771.76 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतका झाला असून, 2024-25 मधील 679.70 दशलक्ष डॉलरच्या तुलनेत त्यात 13.54 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे

प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे बाजारपेठेची उपलब्धता वाढवून, गुंतवणुकीला चालना देऊन, अधिक आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देऊन आणि दोन्ही देशांमधील शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लावून द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक दृढ होईल अशी अपेक्षा आहे. दोन्ही देश न्याय्य आणि परस्पर हिताच्या तत्त्वांवर आधारित व्यापक, संतुलित आणि सर्वसमावेशक मुक्त व्यापार करार करण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande