पंचवटीत ७० लाखांची लूट करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
नाशिक, १४ जुलै (हिं.स.) : पंचवटी परिसरात बंदुकीचा धाक दाखवून ७० लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ८२ लाख १० हजार रुपयांचा
Interstate gang that looted


नाशिक, १४ जुलै (हिं.स.) : पंचवटी परिसरात बंदुकीचा धाक दाखवून ७० लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिलेसह चार आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ८२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ५५ लाख १० हजार रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा कार, रिव्हॉल्वरसदृश शस्त्र, एमपी-५ रायफलसदृश शस्त्र, बनावट शासकीय ओळखपत्रे, शिक्के आणि इतर साहित्याचा समावेश आहे.

८ जुलै २०२६ रोजी दोन पुरुष आणि एका महिलेने पंचवटीतील दिंडोरी रोड परिसरात सरकारी दिवा लावलेल्या इनोव्हा कारमधून येत स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगितले. त्यांनी फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवत जबरदस्तीने वाहनात बसवले. त्यानंतर फिर्यादीच्या बॅगेतील ७० लाख रुपयांची रोकड आणि मोबाईल हिसकावून घेतला.

आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि मुंबई-पुणे महामार्गावर सोडून पलायन केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ ने तपास सुरू केला.

घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान एक आरोपी नाशिक रोड रेल्वे स्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. मात्र आरोपी मुंबईच्या दिशेने गेल्याचे समोर आल्यानंतर पथकाने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात शोधमोहीम राबवून इतर आरोपींना ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आयकर विभाग, गृह विभाग, अँटी करप्शन ब्युरो आणि रेल्वे विभागाची बनावट ओळखपत्रे, रेल्वे पास तसेच विविध शासकीय बनावट शिक्के जप्त करण्यात आले आहेत. या साहित्याचा वापर करून आरोपींनी आणखी काही गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

अटक केलेल्या आरोपींची नावे उमाशंकर प्रेमशंकर वर्मा (रा. रामनगर, आजमगड, उत्तर प्रदेश), सुजीतकुमार राजकिशोर दुबे (रा. मोतीनगर, धनबाद, झारखंड), निलेश अशोक पाका (रा. नागेबंदर, वसई) आणि संगीता हंसराज अहिरे (रा. कोणार्क नगर, नाशिक) अशी आहेत.

या टोळीकडून आणखी कोणाची फसवणूक किंवा लूट झाली असल्यास संबंधितांनी गुन्हे शाखा युनिट-१, नाशिक शहर येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande