राज्यात पुढील 5-6 दिवस पावसाची शक्यता कमी; 20 जुलैनंतर हवामान बदलाचे संकेत
मुंबई, 14 जुलै (हिं.स.)। राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा विश्रांती घेतल्याचे चित्र असून, पुढील पाच ते सहा दिवस बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रशांत महासागरातील एल निनोचा वाढता प्रभाव आणि अफ
MH Monsoon Break Heavy Rain Forecast From 20 July


मुंबई, 14 जुलै (हिं.स.)। राज्यात मान्सूनने पुन्हा एकदा विश्रांती घेतल्याचे चित्र असून, पुढील पाच ते सहा दिवस बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. प्रशांत महासागरातील एल निनोचा वाढता प्रभाव आणि अफगाणिस्तानातून भारताच्या दिशेने वाहणारे कोरडे वारे यामुळे मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. त्यामुळे मुंबई, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर मंदावण्याची शक्यता आहे. बुधवारी आणि गुरुवारी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडू शकतात, मात्र त्यातून शेती किंवा जलसाठ्यांना फारसा दिलासा मिळण्याची शक्यता नाही.

सध्या राज्यात दमट वातावरण आणि उकाडा वाढण्याची शक्यता असून, पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांबाबत शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. विशेषतः मराठवाड्यात जुलैचा दुसरा आठवडा संपत आला तरी पेरण्या अपेक्षित प्रमाणात पूर्ण झालेल्या नाहीत. अनेक भागांत पावसाअभावी पेरण्या रखडल्या असून, ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.

विदर्भातही पावसाची लक्षणीय तूट कायम आहे. दरवर्षी जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठते, मात्र यंदा पावसाने दडी मारल्यामुळे धरणांतील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही चिंता वाढू लागली आहे.

दरम्यान, 20 जुलैनंतर हवामानात काहीसा बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास मान्सूनला पुन्हा चालना मिळू शकते. या प्रणालीमुळे अफगाणिस्तानातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र विदर्भाच्या जवळ तयार झाल्यास त्या भागात तुलनेने अधिक पाऊस पडू शकतो, तर मराठवाड्यात त्याचा परिणाम मर्यादित राहण्याची शक्यता आहे. मात्र हा पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाइतका तीव्र असेल, असे सध्या तरी दिसत नाही. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यातील शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा 20 जुलैनंतरच्या हवामानातील संभाव्य बदलाकडे लागल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande