
छत्रपती संभाजीनगर, 14 जुलै, (हिं.स.)। राजूर येथे अप्पर तहसील मुख्यालय कार्यालय स्थापन करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणस्थळी आमदार नारायण कुचे यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. या आंदोलनात सहभागी असलेले कैलास पुंगळे, श्री. अरविंद थोटे, विनोद पुंगळे तसेच परिसरातील अनेक नागरिकांनी आपल्या मागणीमागील भूमिका, स्थानिक अडचणी आणि जनभावना यांची माहिती दिली.
राजूर व परिसरातील नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध शासकीय कामांसाठी मोठा प्रवास करावा लागतो. त्यामुळे अप्पर तहसील मुख्यालयाची स्थापना ही केवळ स्थानिकांची मागणी नसून, प्रशासन अधिक लोकाभिमुख, गतिमान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक बाब असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा केली. राजूर परिसराची परिस्थिती, नागरिकांची गैरसोय आणि प्रशासनिक गरज याबाबत त्यांना माहिती दिली. त्यांनी या मागणीची गंभीर दखल घेत तातडीने संबंधित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे पाठविण्याबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
महसूल मंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर आंदोलनकर्त्यांशी पुन्हा चर्चा करण्यात आली. शासनाने विषय गांभीर्याने हाताळण्याचे आश्वासन दिल्यानंतर, भोकरदन विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. संतोष पाटील दानवे आणि माझ्या हस्ते उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले. संवादाच्या माध्यमातून मार्ग काढत आंदोलनाची यशस्वी सांगता झाल्याबद्दल सर्व आंदोलनकर्ते आणि नागरिकांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले.
याप्रसंगी उपविभागीय दंडाधिकारी पगारे, संबंधित विभागांचे अधिकारी, स्थानिक पदाधिकारी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजूर परिसरातील जनतेच्या न्याय्य आणि विकासाभिमुख मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत राहू. सर्वसामान्य नागरिकांना अधिक चांगल्या आणि सुलभ शासकीय सेवा मिळाव्यात, यासाठी शासनस्तरावर आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis