
बीड, 14 जुलै, (हिं.स.) - अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे एका तरुणाची चाकू भोसकून आणि डोक्यात वीट मारून निर्घृण हत्या करण्यात आली. ज्ञानेश्वर उत्तरेश्वर वाकडे (वय २१, रा. पट्टीवडगाव) असे या मृत तरुणाचे नाव आहे. क्षुल्लक वादातून आणि सोशल मीडियावरील वर्चस्वाच्या रागातून ही हत्या झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, पळून जाण्याच्या प्रयत्नात एका आरोपीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, आरोपींना आश्रय देणाऱ्या मंगल कार्यालय मालक आणि व्यवस्थापकावर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात दिवसभर ठिय्या दिला.
ज्ञानेश्वर वाकडे हा लातूर येथील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून काम करत होता. तो कामानिमित्त आपल्या गावी पट्टीवडगाव येथे आला होता. रात्री साडेसहाच्या सुमारास तो मित्र याच्यासोबत पैसे काढण्यासाठी बाहेर पडला. अंबाजोगाईहून काम आटोपून परतत असताना शेपवाडी आणि धायगुडा पिंपळादरम्यान त्यांचा सामना झाला. तिथे सोशल मीडियाच्या कारणावरून शाब्दिक चकमक उडाली. 'मला हलक्यात घेऊ नका' अशी धमकी देऊन ते तिघे निघून गेले.
या प्रकरणी ज्ञानेश्वरचे वडील उत्तरेश्वर वाकडे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत घाटनांदूर येथून पाच आरोपींना अटक केली. यातील एका आरोपीने पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र भिंतीवरून उडी मारताना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ग्रामीण पोलीस ठाण्यात ग्रामस्थांचा जमाव आक्रमक झाल्याने परिस्थिती चिघळण्याची दाट शक्यता निर्माण झाली असताना, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शरद जोगदंड यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांनी संतप्त आंदोलकांशी थेट संवाद साधला. नातेवाईकांच्या भावना आणि आक्रोश समजून घेत त्यांना शांत करण्याचे काम त्यांनी केले. कायदेशीर प्रक्रियेची योग्य माहिती देऊन आणि दोषींवर कडक कारवाईचे आश्वासन देऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ दिली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis