भारताची ‘ऑरेंज इकॉनॉमी’ जागतिक स्तरावर नेण्यासाठी सर्जनशील कौशल्य विकासावर भर
आयआयसीटीच्या माध्यमातून एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्राला मिळणार नवी दिशा नागपूर, 14 जुलै (हिं.स.) : चित्रपट निर्माते, डिजिटल आशय निर्माते आणि विविध सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिक उच्च दर्जाचा आशय तयार करत असून जागतिक ‘ऑरेंज इकॉनॉमी’मध्ये भारताचे स्थ
कार्यशाळेला संबोधित करताना आशिष कुलकर्णी आणि स्मिता वत्स शर्मा


आयआयसीटीच्या माध्यमातून एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्राला मिळणार नवी दिशा

नागपूर, 14 जुलै (हिं.स.) : चित्रपट निर्माते, डिजिटल आशय निर्माते आणि विविध सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिक उच्च दर्जाचा आशय तयार करत असून जागतिक ‘ऑरेंज इकॉनॉमी’मध्ये भारताचे स्थान मजबूत करण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. सध्या जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेत भारताचा वाटा सुमारे 3 टक्के असून पुढील दशकात तो 12 ते 15 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (आयआयसीटी)च्या संचालक मंडळाचे सदस्य डॉ. आशिष कुलकर्णी यांनी दिली.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी)तर्फे नागपूर येथील चिटणवीस सेंटर येथे आयोजित ‘भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी भविष्याभिमुख मनुष्यबळ निर्मिती’ या विषयावरील ‘वार्ता’ या एकदिवसीय माध्यम कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक (पश्चिम विभाग) स्मिता वत्स शर्मा होत्या. यावेळी डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, भारताच्या सर्जनशील क्षेत्राच्या विकासासाठी आयआयसीटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)च्या सहकार्याने विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासून सर्जनशीलता आणि कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी ‘कौशल बोध’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. तसेच देशभरातील 500 महाविद्यालये आणि 15 हजार शाळांमध्ये एव्हीजीसी (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) कंटेंट क्रिएटर प्रयोगशाळा स्थापन करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

आयआयसीटी जुलै 2025 पासून मुंबईतील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) संकुलातून एव्हीजीसी-एक्सआर (ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी) क्षेत्रासाठी राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र म्हणून कार्यरत आहे. हब-अँड-स्पोक मॉडेलद्वारे या क्षेत्रातील कौशल्याधारित अभ्यासक्रम देशभर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

भारताची समृद्ध कथाकथन परंपरा आणि स्वदेशी ज्ञानप्रणाली आता डिजिटल माध्यमांद्वारे जागतिक स्तरावर पोहोचत असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले. सर्जनशील क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकारची विविध मंत्रालये चित्रपट व सर्जनशील संस्थांच्या सहकार्याने विशेष अभ्यासक्रम विकसित करत आहेत, ज्यामुळे कौशल्य विकासाच्या नव्या संधी निर्माण होतील असे त्यांनी सांगितले. यावेळी स्मिता वत्स शर्मा यांनी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली.कार्यशाळेच्या प्रारंभी मुंबई पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालक जयदेवी पुजारी स्वामी यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम व दूरसंवाद अधिकारी सौरभ खेकडे यांनी केले, तर माध्यम व दूरसंवाद अधिकारी धनंजय वानखेडे यांनी आभार मानले.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande