
वर्धा, 14 जुलै (हिं.स.) | प्राथमिक शाळा, धनोडी (नांदपूर), येथील वर्ग खोलीचा स्लॅब रात्रीच्या सुमारास कोसळला. ही घटना शाळा उघडल्यानंतर उघडकीस आली. ही घटना शाळा सुरू नसताना घडल्याने मोठा अनर्थ टळला. शाळेच्या इमारतीच्या वाईट परिस्थिती बद्दल, एक वर्षा अगोदरच शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा हिवाळे तसेच धनोडी (नांदपूर) गावाच्या सरपंच्या कोमल सागर कोल्हे यांनी आर्वी पंचायत समिती व जिल्हा परिषदेला पत्राद्वारे कळविले होते.
जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी देखील केली होती. परंतु, जिल्हा परिषद, व पंचायत समितीने याकडे दुर्लक्ष केले. शाळेला एकच वर्ग खोली आहे. एक ते पाच वर्गापर्यंत या शाळेत शिक्षण घेतल्या जाते. एक ते पाच वर्गाकरिता दोन शिक्षिका आहे. शाळेची इमारत सुरक्षित नसल्यामुळे व एकच वर्ग खोली असल्यामुळे, विद्यार्थ्यांची संख्या आता केवळ २४ राहिलेली आहे. या विषयाबद्दल नांदपूर येथील अरविंद लिल्लोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवित दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी