रत्नागिरीत बुधवारी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन
रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (क्रांतीची धगधगती ज्वाला) हा
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील कार्यक्रम


रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनकार्यावर आधारित विश्वभूषण स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (क्रांतीची धगधगती ज्वाला) हा नृत्य, संगीत, नाट्यमय कार्यक्रम बुधवारी, दि. १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा कार्यालयाजवळ मराठा भवन सभागृहात हा कार्यक्रम सुरू होईल. या कार्यक्रमाची निर्मिती व सादरीकरणाची जबाबदारी खल्वायन रत्नागिरी या संस्थेकडे आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि रत्नागिरी हे एक अतूट नाते आहे. स्वातंत्र्यवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रत्ननगरीमध्ये राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि खल्वायन या सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध संस्थेची निर्मिती व सादरीकरणातून सावरकरांचे स्मरण हा एक सुवर्णयोग आहे.

कार्यक्रमाचे लेखन, रत्नागिरीतील सुप्रसिद्ध लेखक, नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी केले आहे. निवेदन प्रदीप तेंडुलकर करणार आहेत. रत्नागिरीतील सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना सोनम जाधव व सहकारी आणि भरतनाट्यम नृत्यांगना मीरा खालगावकर-जोशी व सहकारी या नृत्यातून व सुप्रसिद्ध गायक राम तांबे व मुग्धा गावकर (गोवा) सावरकरांनी लिहिलेल्या संगीत नाटकातील नाट्यपदांच्या सादरीकरणातून हा कार्यक्रम रंगतदार करणार आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकारक कार्याचा, सामाजिक सुधारणांचा आणि राष्ट्रभक्तीचा जीवनप्रवास संगीत, नृत्य व निवेदनाच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande