
रायगड, १४ जुलै (हिं.स.) : गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या भात रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले असून दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत सेस फंडातून ७५ टक्के अनुदानावर भातबियाणे वाटपासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील सुमारे १२ ते १५ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यावर्षी रायगड जिल्ह्यात ६,४०० हेक्टर क्षेत्रावर भात रोपवाटिका तयार करण्यात आली होती. या रोपवाटिकेतून सुमारे ६४ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणे अपेक्षित होते. मात्र, गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे १,९०० हेक्टर क्षेत्रावरील रोपवाटिका पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. अलिबाग, पेण, पाली आणि रोहा तालुक्यांतील शेतकरी यामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी करण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत कमी कालावधीत तयार होणाऱ्या एमटीयू-११५३ (MTU-1153) या भातबियाण्याचे वाटप करण्यात येणार आहे. हे वाण ११० ते ११५ दिवसांत काढणीस येणारे असून, महाबीज या शासकीय संस्थेमार्फत त्याची खरेदी केली जाणार आहे. १० किलो वजनाची बियाण्याची बॅग शेतकऱ्यांना केवळ १३५ रुपयांत उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यापूर्वी या योजनेसाठी कृषी विभागाकडे केवळ १० लाख रुपयांची तरतूद होती. मात्र, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन निधीत वाढ करत ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीचा ७/१२ उतारा आणि आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुक्यातील पंचायत समितीच्या कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत रायगड जिल्हा परिषदेमार्फत प्रथमच ७५ टक्के अनुदानावर भातबियाणे वाटपासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी केले.
------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)