रत्नागिरी : मुलांच्या मोबाइलच्या गैरवापराबाबत पालकांचे प्रबोधन
रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । येथील रा. भा. शिर्के प्रशालेत मुलांच्या मोबाइलच्या गैरवापराबाबत पालकांचे प्रबोधन करणारा ''गूगल पेरेंटल कंट्रोल'' कार्यशाळा पार पडली. त्यावेळी १०० हून अधिक पालक उपस्थित होते. मुलांकडून होणारा मोबाइलचा गैरवापर आणि त्
गूगल पेरेंटल कंट्रोल कार्यशाळेत डॉ फाटक यांचे स्वागत


रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । येथील रा. भा. शिर्के प्रशालेत मुलांच्या मोबाइलच्या गैरवापराबाबत पालकांचे प्रबोधन करणारा 'गूगल पेरेंटल कंट्रोल' कार्यशाळा पार पडली. त्यावेळी १०० हून अधिक पालक उपस्थित होते.

मुलांकडून होणारा मोबाइलचा गैरवापर आणि त्यामुळे निर्माण होणारे धोके टाळण्यासाठी पालकांनी जागरूक राहणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत पालक सभेचे औचित्य साधून 'गूगल पेरेंटल कंट्रोल' या विषयावर एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तनसंध्या-रत्नागिरी आणि डॉ. अक्षय फाटक यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा झाली.

रा. भा. शिर्के प्रशालेच्या मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून आणि सूचनेवरून या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ.पवार व पर्यवेक्षिका सौ. कांबळे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. उपक्रमात कीर्तनसंध्या आणि डॉ. अक्षय फाटक यांनी पालकांशी संवाद साधला.

आजच्या डिजिटल युगात मुले मोबाइलवर काय पाहत आहेत, काय करत आहेत, यावर पालकांचे लक्ष असणे आवश्यक आहे. मुलांच्या वर्तनावर, आचारावर आणि विचारांवर योग्य संस्कार व्हावेत, तसेच त्यांना ऑनलाइन धोक्यांपासून वाचवता यावे, यासाठी 'पेरेंटल कंट्रोल' या सुविधेचा वापर मोबाइलमध्ये कसा करावा, याचे सविस्तर व तांत्रिक मार्गदर्शन डॉ. फाटक यांनी केले.

कार्यशाळेत शाळेतील १०० हून अधिक पालकांनी उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. पालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेल्या या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि उपस्थित पालकांनी आयोजकांचे आभार मानले.

याच विषयावरच्या कार्यशाळा प्रत्येक शाळेमध्ये घेण्याचे कीर्तनसंध्या रत्नागिरीचे उद्दिष्ट आहे. पालक आणि पाल्य यातील संवाद आणि नाते अधिक चांगल्या प्रकारे निर्माण होण्यास मदत व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande