
लातूर, 14 जुलै (हिं.स.) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा मतदारसंघात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जनसेवा दिन’ तसेच नागरिकांची प्रलंबित महसुली कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’च्या पार्श्वभूमीवर आज अधिकाऱ्यांसोबत नियोजन बैठक घेण्यात आली.
या बैठकीत अभियानाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. आमदार निलंगेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या.
नागरिकांना महसूल विभागासह इतर शासकीय विभागांच्या सेवा सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासोबतच या अभियानाची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असल्याचे सांगत आमदार निलंगेकर यांनी संबंधित यंत्रणांनी प्रभावीपणे कामाला लागण्याचे निर्देश दिले.
----------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis