
कोल्हापूर, 14 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 च्या प्रभावी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त सुधाकर तेलंग यांनी आज इचलकरंजी महानगरपालिकेला भेट देऊन नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या ऑनलाइन सेवांचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे-कोल्हे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. आयुक्त पल्लवी पाटील यांनी स्लाईड प्रेझेंटेशनद्वारे महापालिकेच्या डिजिटल सेवांची माहिती सादर केली.
या सादरीकरणात त्यांनी सांगितले की, महापालिकेकडून नागरिकांसाठी एकूण 67 सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून या सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी डिजिटल प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी राज्य आयुक्त सुधाकर तेलंग म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचा मुख्य उद्देश नागरिकांना शासनाच्या सेवा विहित मुदतीत आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देणे हा आहे. सेवा वेळेत न मिळाल्यास नागरिकांना अपील किंवा तक्रार करण्याचा कायदेशीर अधिकार आहे.
नागरिकांना शासकीय कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता भासू नये, त्यांनी घरबसल्या ऑनलाइन अर्ज करावा आणि त्यांना त्याचे उत्तरही ऑनलाइन मिळावे, अशी व्यवस्था निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इचलकरंजी महानगरपालिकेचे ऑनलाइन सेवांमधील काम समाधानकारक असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी सांगितले की, 15 ऑगस्टनंतर कोणत्याही नागरिकांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार नाहीत. याबाबत आगामी महासभेत प्रस्ताव सादर करून त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीस उपसचिव अनुराधा खानविलकर, कक्ष अधिकारी रंजना गवारी, कक्ष अधिकारी शिल्पा पुरोहित, उपायुक्त राहुल मर्ढेकर, अशोक कुंभार, नंदू परळकर, विद्या कदम, मुख्य लेखाधिकारी विकास खोळपे, सहायक आयुक्त रोशनी गोडे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar