
वर्धा,14 जुलै (हिं.स.) | पद्मश्री डॉ.सिंधुताई सपकाळ यांनी जपलेली मानवतेची परंपरा आजही त्यांच्या संस्थेत तेवढ्याच प्रेमाने आणि आत्मीयतेने जोपासली जाते. त्यांची जन्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यातून संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणाऱ्या ३०० वैदर्भीय वारकऱ्यांचे कुंभारवळण येथील ममता बाल सदन (बालगृह) येथे पारंपरिक वैदर्भीय पुरणपोळीच्या स्वादिष्ट भोजनाने स्वागत करण्यात आले माईंच्या विचारांची ही सेवा-परंपरा सलग २७ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील संस्थेत वारकऱ्यांचा दोन दिवस मुक्काम होता.
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे पहिले मानसपुत्र तथा ममता बाल सदनचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड, ममता सपकाळ, सुजाता गायकवाड, अधीक्षिका स्मिता पानसरे यांनी अत्यंत आत्मीयतेने वारकऱ्यांचे स्वागत केले. वारकऱ्यांसाठी वैदर्भीय परंपरेनुसार पुरणपोळी, चपाती, पाटवळीची भाजी, कढी, पालक व कांदा भजी, वरण-भात, सलाड अशा रुचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आली. रात्री काल्याचे कीर्तन, हरिपाठ आणि भक्तिरसाने ओथंबलेल्या वातावरणात वारकरी संप्रदायाचा आध्यात्मिक सोहळा रंगला. सकाळी आठ वाजता ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या अखंड जयघोषात ही दिंडी जेजुरीमार्गे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली. यावेळी आश्रमातील मुलींनी पावली, फुगडी आणि अभंगांच्या गजरात वारकऱ्यांना भावपूर्ण निरोप दिला.
सिंधुताई मूळच्या वर्धा जिल्ह्यातील तर त्यांची कर्मभूमी पुणे जिल्हा होती. त्यामुळे आपल्या माहेरच्या भूमीतून येणाऱ्या वारकऱ्यांचा सन्मानपूर्वक पाहुणचार करण्याची परंपरा त्यांनी स्वतः सुरू केली होती. वर्धा जिल्ह्यातील दिंडी क्रमांक २१७ मधील जवळपास ३०० वारकरी मागील २७ वर्षांपासून संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होत आहेत. यंदाही दिंडी मालक हभप कवडूजी महाराज कठाने आणि दिंडी चालक लक्ष्मण महाराज तराळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी आळंदीहून पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी