पुणे : एसआयआर कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा : ज्ञानेश भारती
पुणे, 14 जुलै (हिं.स.) : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अचूक आणि त्रुटीमुक्त तयार करण्यावर विशेष भर देत प्रत्येक टप्प्यातील काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचा निय
Voter


पुणे, 14 जुलै (हिं.स.) : विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अचूक आणि त्रुटीमुक्त तयार करण्यावर विशेष भर देत प्रत्येक टप्प्यातील काम निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करावे. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या कामाचा नियमित आढावा घेऊन प्रगतीचे सातत्याने परीक्षण करावे, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे उप निवडणूक आयुक्त ग्यानेश भारती यांनी दिल्या.

पुणे विभागातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी भारत निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव अजोय कुमार झा, उप सचिव अभिनव अग्रवाल, राज्याचे उप मुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांच्यासह पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उप निवडणूक आयुक्त भारती यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना एसआयआर कार्यक्रमातील प्रत्येक काम सर्वोच्च प्राधान्याने आणि जबाबदारीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. कामातील त्रुटी तातडीने दूर करून निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

मतदार यादी अचूक करण्यासाठी गणना अर्ज भरताना प्रत्येक मतदाराची माहिती काळजीपूर्वक पडताळून योग्य नोंद करावी, असेही त्यांनी सांगितले. निश्चित करण्यात आलेल्या कालमर्यादेचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी भर दिला.

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी घरोघरी भेटी देऊन मतदारांच्या माहितीची प्रत्यक्ष पडताळणी करावी, अशा सूचना दिल्या. मतदार यादीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

सर्व आवश्यक कागदपत्रे, अर्ज, नोंदी, छायाचित्रे आणि संबंधित माहिती नियमानुसार व अचूक पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. मतदारांच्या तक्रारी आणि हरकतींचे जलद निराकरण करण्यासाठी पुणे जिल्ह्यात मंडलनिहाय सुनावण्यांऐवजी संबंधित मतदान केंद्रांवरच सुनावणी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सादरीकरणाद्वारे पुणे विभागातील एसआयआर कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती दिली. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांमध्ये एकूण २ कोटी १६ लाख १ हजार १९८ मतदार असून २१ हजार २३७ मतदान केंद्रे आहेत.

विभागातील सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ४७ हजार ७३० मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी नियुक्त करण्यात आले आहेत. गणना अर्जांच्या छपाईचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून एसआयआर कार्यक्रमातील सर्व उद्दिष्टे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यात येतील, असा विश्वास विभागीय आयुक्तांनी व्यक्त केला.

बैठकीला विभागीय आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी तसेच पुणे शहरातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी उपस्थित होते.--------------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande