
-आपतर्फे देशभरात स्टॉप ई-२० पेट्रोल ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम
-केजरीवाल गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता जंतर मंतरला जाणार
नवी दिल्ली, 14 जुलै (हिं.स.)। आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ई-२० पेट्रोलच्या मुद्द्यावर केंद्र सरकारविरोधात भूमिका घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. देशभरातून ई-२० पेट्रोलबाबत वाहनचालकांकडून विविध तक्रारी येत असल्याचा दावा करत त्यांनी सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. तसेच प्रत्येक पेट्रोल पंपावर शुद्ध पेट्रोल आणि ई-२० पेट्रोल हे दोन्ही पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून द्यावेत आणि ई-२० पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज कमी मिळत असल्यास त्याची किंमतही सामान्य पेट्रोलपेक्षा कमी ठेवावी, अश्या दोन प्रमुख मागण्या त्यांनी पत्रातून मांडल्या आहेत. यासोबतच या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांकडे भेटीची वेळही मागितली आहे.
केजरीवाल यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत त्यांनी विविध पेट्रोल पंप आणि सर्व्हिस स्टेशनना भेट देऊन वाहनचालकांशी संवाद साधला. अनेकांनी ई-२० पेट्रोल वापरल्यानंतर वाहनाचे मायलेज कमी झाल्याची तसेच इंजिन आणि इतर सुट्या भागांवर परिणाम होत असल्याची तक्रार केल्याचे त्यांनी नमूद केले. लोकशाही व्यवस्थेत सरकारने जनतेच्या भावना आणि अडचणी समजून घेत त्यावर योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने देशभरात स्टॉप ई-२० पेट्रोल या नावाने ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे नागरिक पंतप्रधानांच्या नावे असलेल्या याचिकेवर स्वाक्षरी करू शकतात आणि ई-२० पेट्रोल वापरताना आलेले अनुभवही नोंदवू शकतात. वाहनाचे मायलेज कमी होणे किंवा तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची माहितीही या याचिकेत नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधानांची भेट झाल्यानंतर देशभरातून मिळालेल्या स्वाक्षऱ्या आणि नागरिकांचे अनुभव त्यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
याशिवाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील पेट्रोल पंप तसेच सर्व्हिस स्टेशनवर जाऊन वाहनचालकांशी संवाद साधावा, त्यांच्या प्रतिक्रिया आणि अनुभवांचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. मोठ्या प्रमाणावर लोकांनी आपले अनुभव मांडल्यास सरकारवर या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा दबाव निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनालाही केजरीवाल यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. परीक्षा व्यवस्थेत सुधारणा, पेपर लीक रोखणे आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या या आंदोलनात ते गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले असून आंदोलनाला आपला पाठिंबा कायम राहील, असेही स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule