
मुंबई, 14 जुलै (हिं.स.)। आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेडची उपकंपनी आणि गृहनिर्माण क्षेत्रातील एक आघाडीची वित्तपुरवठा संस्था असलेल्याआदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेड ने आपल्या संपूर्ण भारतातील वितरण जाळ्याचा विस्तार करण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून महाराष्ट्रभर आपला विस्तार केला आहे. कंपनीने मुंबई, अकोला आणि सांगली येथे तीन नवीन शाखा सुरू केल्या आहेत. मुंबईतील बोरीवली येथील नवीन शाखा ही एबीएचएफएलची या आर्थिक वर्षातील ५० वी शाखा असून, तिचे उद्घाटन आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज गाडगीळ यांच्या हस्ते होणार आहे. या नवीन शाखांमुळे महाराष्ट्रातील एबीएचएफएलच्या शाखांचे एकूण जाळे ३९ पर्यंत पोहोचले आहे; यामुळे राज्यातील कंपनीची उपस्थिती अधिक दृढ झाली असून वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठांमधील ग्राहकांसाठी कंपनीच्या सेवा अधिक सुलभ झाल्या आहेत.
सुधारलेली पायाभूत सुविधा, मेट्रो कनेक्टिव्हिटीचा विस्तार आणि प्रत्यक्ष वापरकर्त्यांकडून असलेली सातत्यपूर्ण मागणी यामुळे मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील एक प्रमुख निवासी केंद्र म्हणून बोरीवलीने आपली स्थिती सातत्याने प्रबळ केली आहे. एकेकाळी शहरापासून दूरचे उपनगर मानल्या जाणाऱ्या या भागात आता गृहनिर्माण क्षेत्रात लक्षणीय बदल दिसून येत आहेत; वेस्टर्न एक्सप्रेस हायवेसारखे प्रमुख मार्ग आणि उपनगरीय रेल्वे स्थानकांजवळ जुन्या, कमी उंचीच्या इमारतींच्या जागी आता आधुनिक सुविधांनी सज्ज अशा उंच निवासी इमारती उभ्या राहत आहेत. अधिक जागा, उत्तम नियोजन आणि दीर्घकालीन स्थैर्य शोधणाऱ्या घर खरेदीदारांना हे उपनगर सातत्याने आकर्षित करत आहे. आपल्या नवीन शाखेच्या माध्यमातून एबीएचएफएल ग्राहकांसाठी गृहकर्जाचे विशेष आणि अनुकूल पर्याय उपलब्ध करून देईल. त्यामुळे त्यांना स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न अधिक सहजतेने आणि सोयीस्करपणे पूर्ण करता येईल.
एबीएचएफएल पगारदार व्यक्ती, स्वयंरोजगारीत व्यावसायिक व इतर स्वयंरोजगारधारक आणि उदयोन्मुख उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी; परवडणारी घरे, प्रीमियम घरे, बांधकाम वित्तपुरवठा आणि मालमत्तेवर आधारित कर्ज यांसारख्या गृहकर्ज सुविधांची विस्तृत श्रेणी उपलब्ध करून देते. सक्षम डिजिटल प्रणालीच्या आधारे ग्राहकांसाठी सुलभ नोंदणी प्रक्रिया, जलद मंजूरी आणि अधिक पारदर्शकता सुनिश्चित करून एक उत्कृष्ट अनुभव प्रदान करते.
या उपक्रमाच्या शुभारंभानिमित्त, एबीएफएचएल नवीन शाखांमधील ग्राहकांसाठी १४ जुलै ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत झिरो लॉगिन फी (कोणतेही लॉगिन शुल्क न आकारणे) आणि ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला त्वरित मंजूरी (स्पॉट लोन सँक्शन) यांसारख्या सुविधा देत आहे; यामुळे ग्राहकांना कर्ज मिळवणे अधिक जलद आणि परवडणारे होणार आहे.
या विस्ताराबाबत बोलताना आदित्य बिर्ला हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पंकज गाडगीळ म्हणाले, महाराष्ट्र ही आमच्यासाठी विकासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बाजारपेठ आहे. ग्राहकांकडून असलेली मोठी मागणी आणि त्यांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता, आम्ही ग्राहकांशी अधिक घनिष्ठ संबंध निर्माण करण्यासाठी आमची प्रादेशिक उपस्थिती वाढवत आहोत. आमचे विस्तारत असलेले वितरण जाळे आणि सक्षम डिजिटल क्षमता यांचा मेळ घालून ग्राहकांसाठी स्वतःचे घर घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि सहज करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर