
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.)। क्षेत्र पंढरपूर येथे 15 ते 29 जुलै 2026 या कालावधीत होणाऱ्या आषाढी वारी यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पंढरपूर शहरातून जाणाऱ्या जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एस. कार्तिकेयन आणि पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण अतुल वि. कुलकर्णी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 33(1)(ब) अंतर्गत अधिकाराचा वापर करून हा आदेश जारी केला आहे. हा आदेश 17 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजल्यापासून 29 जुलै 2026 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या कालावधीत पंढरपूरकडे जाणारी जड व अवजड वाहने संबंधित पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील विविध प्रवेशबिंदूंवर थांबवून त्यांना पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. मात्र, शासकीय अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलिंडर आणि ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे. मोहोळ, टेंभुर्णी, वेळापूर, सांगोला, मंगळवेढा, करकंब आणि कामती परिसरातील प्रमुख चौक व फाट्यांवरून जड वाहनांची वाहतूक बंद करून त्यांना सांगोला, मंगळवेढा, अकलूज, टेंभुर्णी, मोहोळ, वेळापूर आदी मार्गांद्वारे पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड