
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित संशयित नेटवर्क रडारवर
पुणे, 14 जुलै (हिं.स.) : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्कविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. एटीएसने सोमवारी एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासानुसार, शहजाद भट्टी आणि त्याच्या साथीदारांकडून फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्स ऍपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या माध्यमातून काही तरुणांना आपल्या प्रभावाखाली आणून त्यांचा गैरवापर करण्याचा कट रचला जात असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे एटीएसने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणी एकाचवेळी छापेमारी करून इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन आणि इतर महत्त्वाचे साहित्य जप्त केले आहे. जप्त साहित्याचे तांत्रिक विश्लेषण करण्यात येत असून, त्यातून महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची सखोल चौकशी सुरू असून, या कथित नेटवर्कचे इतर संपर्क आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असून, चौकशीतून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता एटीएसने व्यक्त केली आहे.-----------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु