
पुणे, 14 जुलै, (हिं.स.)। संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, सोपानकाका महाराज आणि संतराज महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती नगरी सज्ज झाली असून, वारकऱ्यांच्या सेवेसाठी नागरिक आणि प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामतीकर पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करणार आहेत. प्रत्यक्ष पंढरपूरला जाता येत नसल्याने अनेक भाविक वारकऱ्यांमध्येच विठ्ठलाचे दर्शन घेत त्यांच्या भोजन, निवास आणि अन्य सुविधांची मनोभावे सेवा करतात.
यंदाच्या नियोजनानुसार बुधवारी (ता. १५) संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम बारामतीतील शारदा प्रांगणात होणार आहे. शुक्रवारी (ता. १७) संतश्रेष्ठ सोपानकाका महाराजांच्या पालखीचाही याच ठिकाणी मुक्काम असेल. या दोन्ही पालखी सोहळ्यांसाठी शारदा प्रांगणात प्रशस्त जर्मन हॅंगर उभारण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी (ता. १६) संतश्रेष्ठ संतराज महाराजांचा पालखी सोहळा श्रावण गल्ली परिसरात विसावणार आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून, बारामतीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु