
सोलापूर, 14 जुलै (हिं.स.) : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेच्या कामाचा आढावा घेण्यासाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत कामाची प्रगती अपेक्षेपेक्षा कमी असलेल्या १०३ बीएलओंना यापूर्वी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच प्रगतीचा वेग वाढविण्याच्या सूचना प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केल्या.
बैठकीदरम्यान एका शिक्षक-बीएलओने, तुम्ही काही केले तरीही दिलेले टार्गेट पूर्ण होणार नाही, असे मत व्यक्त केल्याचे उपस्थितांनी सांगितले. त्यावर प्रांताधिकारी पडदुणे यांनी असा नालायकपणा चालणार नाही, अशी प्रतिक्रिया दिल्याचा आरोप करण्यात आला.
'
नालायकपणा' या शब्दावर उपस्थित बीएलओंनी तीव्र आक्षेप घेत निषेध व्यक्त केला. प्रांताधिकाऱ्यांनी वापरलेला शब्द मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संबंधित कर्मचाऱ्यावर एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिल्याचाही आरोप काही बीएलओंनी यावेळी केला.
बीएलओंच्या एकत्रित विरोधानंतर प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी आपण वापरलेले शब्द मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बैठकीतील तणाव निवळला आणि वातावरण शांत झाले.
दरम्यान, या संपूर्ण घटनेचा अहवाल प्रांताधिकारी पडदुणे यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडे सादर केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी कोणती भूमिका घेतात, याकडे संबंधित कर्मचारी आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
----------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड