दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार
मुंबई, 14 जुलै (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. यासाठी दापचरी दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर आर. जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठक
दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार


मुंबई, 14 जुलै (हिं.स.)। पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मौजे दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारण्यात येणार आहे. यासाठी दापचरी दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर आर. जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

फ्रान्समधील रुंगिस येथे असलेल्या बाजाराच्या धर्तीवर दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात वाढवण बंदर विकसित केले जात आहे. वाढवण बंदर जागतिक क्रमवारीत पहिल्या दहामध्ये आणण्याचे लक्ष्य केंद्र सरकार आणि राज्य शासनाने निश्चित केले आहे. बंदर लॉजिस्टिक आणि गोदाम विकासावर आधारित असणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० बिलीयन डाँलर्सवरून ३०० बिलीयन डॉलर्सपर्यंत वाढेल, असा अंदाज आहे.

वाढवण प्रदेश चौथी मुंबई म्हणून विकसित करण्यासाठी बुलेट ट्रेन कॉरिडॉर आणि मुंबईचा कोस्टल रोड पालघरपर्यंत वाढवला जाणार आहे. भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाची उभारणी करण्यासाठी मान्यता दिली आहे. वाढवण बंदराच्या प्रस्तावित कृती आराखड्यामध्ये टप्पा-दोनमध्ये दापचारी फेज १ टर्मिनल मार्केट + कोल्ड चेन लाइव्ह, निर्यात पॅकहाऊस करण्याचा समावेश आहे.

दापचरी येथे महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या दापचरी दुग्ध प्रकल्पाची जागा आहे. वाढवण बंदर दापचरीपासून अगदी जवळ आहे. हा परिसर कृषी क्षेत्रासाठी प्रसिध्द आहे. प्रसिद्ध डहाणू चिकू (सपोता) आणि आंबे आणि सोबतच मच्छीमार समुदाय आणि सागरी खाद्य प्रक्रिया उद्योगाची क्षमताही आहे. पालघर जिल्ह्यात प्रामुख्याने भात, नागली, वरी पीके असून चिकू, आंबा, सिमला मिरची, भाज्यांचे उत्पादन घेतले जाते.

पालघर जिल्ह्यालगत नाशिक, ठाणे जिल्हे असून गुजरात तसेच दादरा नगर हवेली केंद्रशासित प्रदेशाची सीमा देखील आहे. दापचरी दुग्ध प्रकल्पापासून रस्त्याने वाढवण बंदर ४० किलोमीटरवर, पालघर ६२ किलोमीटरवर, ठाणे ११८ किलोमीटरवर, मुंबई विमानतळ १२८ किलोमीटर तर नवी मुंबई विमानतळ १४९ किलोमीटरवर आहे. त्याचबरोबर नाशिक १४६ किलोमीटर, पुणे २७० किलोमीटर, सुरत १५४ किलोमीटर, बडोदा २७८ किलोमीटर, अहमदावाद ३७८ कि. मी. अंतरावर आहे.

दापचरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कृषि बाजाराची उभारणी झाल्यास राष्ट्रीय व राज्य पातळीवर अर्थव्यवस्थेस चालना मिळेल. शेतकरी, व्यापारी व ग्राहक यांच्या सोईचे होणार आहे. त्यामुळे शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या दापचरी दुग्ध प्रकल्पाची जमीन आंतराष्ट्रीय कृषी बाजार उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळास विनामूल्य देण्याचा निर्णय घेण्यात आला.

दापचरी येथील आंतरराष्ट्रीय बाजाराबाबत - वाढवण बंदरात त्वरित प्रवेश. एनएच-४८ आणि महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक यांना रेल्वे जोडणी. राज्यातील आठहून जास्त जिल्ह्यांमधील फळे, भाजीपाला, धान्य आणि मसाल्यांचे समूहाशी कनेक्टिव्हीटी.

एकात्मिक लिलाव प्लॅटफॉर्मसह ई-नाम - शीतगृह पिकवण्याच्या खोल्या, गोदामे. निर्यातभिमुख सुविधा सीमाशुल्क, विलगीकरण, कंटेनर बे शेतकऱ्यांसाठी वसतिगृहे, प्रशिक्षण केंद्रे, सुविधा कक्ष. सौर ऊर्जा, जल पुनर्वापर, कचरा व्यवस्थापन. आग, सीसीटीव्ही, सुरक्षा प्रणाली.

दापचरी आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराचे फायदे - शेतकरी आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढणार. खरेदीदार/निर्यातदारांपर्यंत थेट पोहोचता येणार. काढणीनंतरचे नुकसान कमी होणार (१५-३०% घट). ८,००० ते १५,००० हून अधिक थेट रोजगार उपलब्ध. कौशल्य कार्यक्रमांद्वारे स्थानिक युवक, महिला आणि आदिवासी समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करणे शक्य.

बंदर जोडणी आणि प्रमाणित पायाभूत सुविधांच्या माध्यमातून चिकू, अल्फोन्सो आंबे, इतर फळे/भाज्या, सागरी उत्पादने/समुद्री उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळणार. पुरवठा साखळीची कार्यक्षमता विकसित होणार

केंद्रीकृत, आधुनिक घाऊक विक्रीमुळे विखंडन कमी.

पारदर्शक किंमत आणि डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे उत्पादक आणि ग्राहकांना फायदा .

पालघर जिल्ह्यातील गुंतवणुकीला चालना - सुधारित पायाभूत सुविधांमुळे आसपासच्या परिसराला फायदा, पर्यावरणपूरक कार्यप्रणाली आणि हवामान बदलास अनुकूल पायाभूत सुविधा.

रुंगिस बाजारपेठेच्या धर्तीवर दापचरीचा विकास - फ्रान्समधील रुंगिस येथे असलेल्या बाजाराच्या धर्तीवर दापचरी येथे आंतरराष्ट्रीय कृषी बाजार विकसित करण्यात येणार आहे. रुंगिस येथे जगातील सर्वात मोठी ताजी फळे आणि भाजीपाला घाऊक बाजारपेठ आहे. २३४ हेक्टरवर पसरलेली ही बाजारपेठ जागतिक मापदंड म्हणून ओळखले जाते. येथे दरवर्षी २९ लाख टनांहून अधिक अन्नपदार्थ हाताळले जाते.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande