
रत्नागिरी, 14 जुलै (हिं.स.) । शेतीतील लावणीच्या कामासाठी लवकर उठण्यास सांगितल्याच्या कारणावरून सुनेने सासूला मारहाण केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ (गावणवाडी) येथे घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात सुनेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवर्णा कृष्णा नाचरे (वय ७१, रा. रेहेळ, गावणवाडी, ता. चिपळूण) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी मुलगा दर्शन आणि सून मयूरी यांना, लावणीचे दिवस असल्याने लवकर उठा, अन्यथा शेतीची कामे कशी होणार, असे विचारले. या बोलण्याचा राग आल्याने मयूरीने सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर चुलीजवळ ठेवलेल्या लाकडी फाट्याने सासूच्या डोक्यावर आणि उजव्या हातावर वार करून त्यांना दुखापत केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी