
पहिल्या पंच साक्षीदाराची साक्ष नोंद
पुणे, 14 जुलै (हिं.स.) : संवेदनशील शासकीय आणि संरक्षणविषयक गोपनीय माहिती कथितरित्या पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या गाजलेल्या प्रकरणाच्या सुनावणीला तब्बल तीन वर्षांनंतर विशेष सत्र न्यायालयात सुरुवात झाली आहे. विशेष सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सोमवारी पहिल्या सरकारी पंच साक्षीदाराची साक्ष नोंदविण्यात आली.
सुनावणीदरम्यान पंच साक्षीदाराने एटीएस कार्यालयात पंचनामा करताना पाहिलेल्या डॉ. कुरुलकर यांची न्यायालयातील आरोपीच्या पिंजऱ्यात बसलेल्या व्यक्ती म्हणून ओळख पटवली. न्यायालयीन प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
पुणे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २०२३ मध्ये डॉ. कुरुलकर यांना अटक केली होती. त्यांच्यावर पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या ऑपरेटिव्हशी (PIO) संपर्क साधून संवेदनशील संरक्षणविषयक माहिती पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एटीएसने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले असून, त्यानंतर आता प्रत्यक्ष साक्षी-पुराव्यांच्या नोंदीला सुरुवात झाली आहे.
विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी पंच साक्षीदाराची सरतपासणी घेतली. साक्षीदाराने न्यायालयात सांगितले की, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तो एटीएस कार्यालयात गेला होता आणि पंचनामा प्रक्रियेदरम्यान पंच म्हणून उपस्थित होता.
या प्रकरणातील पुढील सुनावणीदरम्यान अन्य साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार असून, त्यानंतर पुराव्यांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेला आता प्रत्यक्ष वेग आला आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु